June 19, 2025

त्रिरत्न बौद्ध महासंघाचे योगदान आणि धम्मचारी जिनौदय यांची प्रेरणादायी वाटचाल

  • बौद्ध धम्माचा प्रसार हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचाही भाग आहे.हा धम्म पूर्ण भारतात रुजवून,विश्वरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी इंग्लंड येथील पूज्य भंते उर्गेन संघरक्षित यांनी महत्वाची भूमिका बजावली.त्यांनी स्वतःदोन वेळा परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन बौद्ध धम्म, तथागत गौतम बुद्ध यांचे विचार आणि शिकवणूक संपूर्ण भारतभर पसरवण्याचा संकल्प केला.
    या संकल्पातूनच त्रिरत्न बौद्ध महासंघ या संघटनेची स्थापना झाली.या महासंघाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातही मोठे योगदान दिले गेले.देशभर विविध ठिकाणी बहुजन हिताय विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतीगृहांची उभारणी करून,बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा ध्येयवादी उपक्रम सुरु केला गेला.या उपक्रमाने समाजाच्या जडणघडणीत मोलाची भर घातली आहे.
    आज या महान परंपरेचा वारसा पुढे नेत असलेले कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिक्षा घेण्याचे अगोदरचे नाव आयु.अशोक सावंत अर्थात धम्मचारी जिनौदय यांनी त्यांच्या स्वगृहात एका विशेष भेटीत कळंब तालुक्यातील त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या कार्याची माहिती दिली.या भेटीत संघाच्या माध्यमातून होत असलेल्या बौद्ध धम्म प्रसाराबाबत सखोल चर्चा झाली.धम्माच्या विचारांची पिढीपर्यंत पोहोच करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
    धम्मचारी जिनौदय यांचे कार्य केवळ धम्म प्रचारापुरते मर्यादित नाही,तर सामाजिक प्रबोधन,शिक्षणप्रसार आणि युवकांचे मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांमध्येही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.त्रिरत्न बौद्ध महासंघाची कार्यपद्धती आणि त्यामागचा उद्देश पाहता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हे ब्रीद प्रत्यक्षात उतरवले जात आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
    याप्रसंगी त्यांना प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा संपादक सुभाष द.घोडके लिखित विरूंगळा हे पथनाट्य व अग्रलेखांचा संग्रह असलेले पुस्तक व बहुजनांच्या न्याय हक्कासाठी शहरातून प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावन ज्योत चा अंक सप्रेम भेट देण्यात आला.
    ही भेट आणि त्यातून झालेली चर्चा निश्चितच प्रेरणादायी ठरली असून, बौद्ध धम्माच्या उज्ज्वल भविष्यासाठी उर्जेचा नवा स्रोत निर्माण करणारी आहे…
  • — प्रा.अविनाश रंजना सुभाष घोडके
    भैरवनाथ अध्यापक विद्यालय,कळंब
error: Content is protected !!