कळंब – लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने कळंब येथील तहसीलदार हेमंत ढोकले यांना दि.१९ मे २०२५ रोजी विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात श्रावण बाळ योजना,संजय गांधी निराधार योजना यासारख्या महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.तसेच महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचे अर्ज त्वरीत मंजूर करावेत, समाजकल्याण विभागाचा निधी इतर योजनेत वळवू नये, ग्रामपंचायतीमार्फत चालणारी “आपले सरकार सेवा केंद्र” पुन्हा पूर्ववत सुरु करावीत,अशीही मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी खते व बी-बियाणे पुरवठा करण्यात यावा, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना त्वरित राबवावी, तसेच पीएमईजीपी व सीएमईजीपी योजनांतर्गत घेतलेल्या कर्जांची माफी करावी, या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. याशिवाय अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उपविभागीय कार्यालयाकडून नाहक त्रास दिला जात असल्याचे नमूद करत,प्रमाणपत्रासाठी आवश्यक किमान कागदपत्रांच्या आधारे ते त्वरीत निर्गमित करावेत,अशी मागणी करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कळंबमध्ये अधिक कागदपत्रांची मागणी केल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे,हेही निवेदनात नमूद करण्यात आले. या निवेदनावर लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,मुकेश गायकवाड, दीपक हौसलमल,बप्पा सावंत, शहर अध्यक्ष नागेश धिरे,विशाल शिंदे,सुधाकर मुळीक, बाबुराव गुंजाळ यांसह मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड