कळंब – ‘मुस्लिम समाजाने मुलींना शिक्षण देण्यास प्राधान्य द्यायला हवे’,असे मत पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी रविवारी कळंब येथील तालीम फाउंडेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले आहे. ‘तालीम से तरक्की’ या कार्यशाळेचे आयोजन तालीम फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले होते.यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक गौहर हसन,कुरने एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रोफेसर मुबिन कुरने यांची उपस्थिती होती.तर मौलाना आझाद महामंडळाचे रिझवान पठाण, डॉ.साजिद चाऊस,शिक्षक अब्दुल माजिद काझी,मौलाना याहया,मौलाना आरिफ यांची उपस्थितीती होती.मुस्लिम समाजात शिक्षणाचा अभाव आहे.त्यामुळे शिक्षण किती महत्वाचं आहे? 10 वी,12वी नंतर काय करायला हवे? पालकांची असणारी भूमिका, शिष्यवृत्तीची माहिती,यावर चर्चा करण्यासाठी तालीमसे तरक्की म्हणजेच शिक्षणातून यश या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.ज्यात गौहर हसन यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला. ते म्हणाले मुलींनी आज शिक्षणावर भर दिला तर तुम्ही उद्याच्या कर्नल सोफिया कुरेशी आहात. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या पत्नी धाराशिवच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक आमना शफाअत यांनी कशी मेहनत घेऊन युपीएससी पास केली, यावर प्रकाश टाकला. इतकंच नाही तर मोहंमद पैगंम्बरांनी शिक्षणाचे कसे महत्व सांगितले होते, हे देखील सांगितले.रिझवान पठाण यांनी मौलाना आझाद महामंडकडून शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचे याबाबत मार्गदर्शन केले. तर प्रोफेसर कुरने यांनी मुलांच्या शिक्षणात पालकांची भूमिका किती महत्वाची आहे, यावर भाष्य केले. त्यांनी देखील मुस्लिम समाजातील स्त्री शिक्षणावर भर दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमाला पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालीम फाउंडेशनच्या टीमने परिश्रम घेतले.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे