August 9, 2025

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास बंदी

  • धाराशिव (जिमाका) – “सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध,व्यापार विनियमन आणि उत्पादन,पुरवठा व वितरण) कायदा, २००३” च्या कलम ४ नुसार ही अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी काढले आहे.या आदेशानुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आणि धूम्रपानावर प्रतिबंध करण्यात आला आहे.
    जिल्ह्यातील सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालये,कार्यालयीन परिसर शासकीय व खाजगी आस्थापना,शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्था तसेच शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणे तंबाखूमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य कायदा २००३ च्या कलम ४ मधील तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
    धाराशिव शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी (शासकीय,निमशासकीय, खाजगी संस्था,शैक्षणिक संस्था, कार्यालय परिसर,वाहतूक ठिकाणे इ.) तंबाखू, सुपारी,पानमसाला, गुटखा आणि ई-सिगारेटसह धूम्रपान व धुंकण्यास सक्त मनाई आहे.
    १८ वर्षाखालील व्यक्तींना तंबाखूजन्य उत्पादने विक्रीस मनाई तसेच शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात अशी विक्री निषिद्ध आहे.सर्व कार्यालयांनी “धूम्रपान निषिद्ध क्षेत्र” असे स्पष्ट फलक (६० से.मी. x ४५ से.मी.) दर्शनी भागात लावावेत.
    कारवाईचा मासिक अहवाल व दंडवसुलीचा तपशील पुढील ई-मेलवर सादर करावा लागणार आहे.
    ntcposmanabad@gmail.com आणि cs.osmanabad1@rediffmail.com
    दंड वसुलीसाठी आवश्यक पावती पुस्तके जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालयातून घ्यावीत.कायद्यातील कलम ४ व ६ चे उल्लंघन केल्यास दंड कोषागार कार्यालयाच्या खाती क्रमांक ०२१००६७२०१ मध्ये भरावा.
    सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांनी व्यापक प्रचार करावा आणि जनजागृती फलक लावावेत. प्रत्येक कार्यालयाने कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी एक जबाबदार समन्वयक नेमुन नियमित कार्यवाही अहवाल पाठवावा लागणार आहे.
    ह्या आदेशाची अंमलबजावणी संपूर्ण शहरातील शासकीय,खाजगी,शैक्षणिक, वैद्यकीय,धार्मिक स्थळे,पर्यटनस्थळे, वाहतूक केंद्रे,बाजारपेठा,सिनेमागृह,बागा इत्यादी सार्वजनिक ठिकाणी केली जाईल. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,धाराशिव यांनी या आदेशात नमूद केले आहे.
error: Content is protected !!