धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत धाराशिव पाटबंधारे मंडळाच्या वतीने 16 मार्च ते 22 मार्च 2025 या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.या सप्ताहाचा शुभारंभ मंडळ कार्यालयात बोरी,मांजरा, तेरणा आणि सिना नदीच्या पाण्याच्या कलश पूजनाने करण्यात आला. या उपक्रमांतर्गत अधीक्षक अभियंता विजय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम, मेळावे आणि सभांचे आयोजन करण्यात आले.लाभक्षेत्र,कार्यक्षेत्र,शाळा, महाविद्यालये,ग्रामपंचायती आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी संवर्धन,जलव्यवस्थापन,पाण्याची बचत आणि त्याचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय,भिंतीवर पाणी बचतीची संदेशपर भित्तीपत्रके लावण्यात आली. पाण्याच्या जपणुकीसाठी नागरिकांनी “जलप्रतिज्ञा” घेतली. त्यानुसार, पाण्याचा काटकसरीने वापर,जलस्रोतांचे संरक्षण आणि पाण्याच्या कायद्यांचे पालन करण्याचे संकल्प करण्यात आले.या अभियानाचा भाग म्हणून २१ मार्च रोजी सिंचन भवन ते समता कॉलनी मार्गे पुन्हा सिंचन भवन येथे जलदौड काढण्यात आली. तसेच,जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धती,प्रकल्पांचे सर्वेक्षण,अंदाजपत्रक,निविदा प्रक्रिया,भूसंपादन कायदे आणि आस्थापना विषयक नियम याबाबत एक दिवसीय प्रशिक्षणही घेण्यात आले.या कार्यक्रमास कार्यकारी अभियंते इंजि.प्रविण चावरे, इंजि.अमोल नाईक,इंजि.दिनेश खट्टे, सहाय्यक अधीक्षक अभियंता इंजि.चंद्रकांत पाटील तसेच उपअभियंता,शाखा अभियंते आणि विभागीय अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी