तूटलेल्या लोखंडा प्रमाणेच तडा गेलेल्या कोमल हृदयास पत्रकारितेच्या माध्यमातून सांधणारे सुभाष द.घोडके. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजे पिंपळगाव (डोळा) येथील आठरा विश्व दारिद्रय पूजलेल्या स्मृतीशेष बगडाबाई व स्मृतीशेष दशरथ एकनाथ घोडके यांच्या पोटी दिनांक ९ जानेवारी १९६३ रोजी जन्म घेतलेले पत्रकार तथा लेखक सुभाष घोडके यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा मानाचा असलेला कै.सुधाकर सावळे साप्ताहिक पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.पत्रकार दिनानिमित्त १० जानेवारी २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते सुभाष द.घोडके यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ११ जुलै १९८९ ला ढोकी रोड कळंब येथे आसरा स्टील इंडस्ट्रीजच्या माध्यमातून वेल्डिंगचा व्यवसाय सुरू केलेले सुभाष घोडके यांनी १९९४ पासून पत्रकारितेला सुरुवात केली. तुटलेल्या लोखंडाला योग्य आकार देऊन आकर्षक बांधणी करणारे सुभाष घोडके यांना लिखाणाचा छंद असल्याने सा.युवा मशाल,दै.जनमत व दै.संघर्ष या वर्तमानपत्रातून लिखानास सुरुवात केली. त्यांचे जनता दलातील सहकारी शेख रब्बानी,नरोटे अप्पा,हंबीरे आबा यांच्या पुरोगामी विचारांशी घोडके यांची सांगड जुळल्याने त्यांच्या वर्तमान पत्रातून लिखानाची संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने केले. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले प्रसार माध्यम आणि समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधूता,धर्मनिरपेक्षता ही विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधानिक मूल्य अंगीकारून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर स्वार होऊन सन २००१ ते २००३ – परिवर्तन शक्ती,सन २००४ ते २०१३ – साक्षी बहुजनांचे आश्रू पुसणारे, सन २०१४ ते २०१५ प्रबुद्ध साक्षी आणि डॉ.अशोक मोहेकर यांच्या सहकार्यातून सन २०१६ ते आज तागायत साक्षी पावन ज्योत या स्वतःच्या साप्ताहिक वर्तमानपत्रातून दलित- बहुजनांच्या न्याय हक्कासाठी, दबलेले-पिछलेले प्रश्न वेशीवर टांगून सर्वसामान्य जनास न्याय मिळवून देण्याचे कार्य प्रामाणिक आणि अखंडित अहोरात्र पोट तिडकीने सुरू आहे. धनदांडग्याच्या दबावास बळी न पडता किंवा कोणाच्याही लाचारीस भिक न घालता स्वाभिमानाने पत्रकारिता करत असताना कटू व गोड अनुभवाचे चटके सहन करत आजही पत्र्याच्या शेडमध्ये सुखी-समाधानी आहेत.त्यांच्या वर्तमानपत्रातून नवोदित साहित्यिक घडले असल्याचा व सर्व सामान्यास न्याय मिळवून देता आला असल्याने ते आत्मिक समाधानी असून कळंब तालुका पत्रकार संघाने पुरस्कारित केल्याने भारावून गेलो असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा