June 25, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले

  • धाराशिव (जिमाका) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन भत्ता,निवास भत्ता व निर्वाह भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार या योजनेमधून उपलब्ध करुन देण्यात येतात.वसतिगृह प्रवेश व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत.त्याअनुषंगाने सन २०२४ -२५ करिता अर्ज सादर करण्यासाठी १६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.परंतु, विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र,स्वाधार योजनेचा ऑनलाईन अर्ज करताना येत असलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२४-२५ साठी आता ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे.
    ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरत असताना न्यु (New) टॅबवर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे व ज्या विद्यार्थ्यांनी चालू अभ्यासक्रमासाठी मागील वर्षी स्वाधार योजनेचा लाभ घेतलेला आहे,असे विद्यार्थी नुतनीकरणासाठी पात्र होतात.अशा विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ करिता ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरतांना न्यु (New) ऐवजी एक्झिस्टिंग (Existing) टॅबवर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.तसेच ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज सादर केलेले आहेत आणि वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे आपोआप स्वाधार योजनेसाठी वर्ग होणार आहेत,अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.
    तरी ज्या पात्र विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत अर्ज सादर केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेकरिता ३१ डिसेंबरपूर्वी अर्ज करून स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत धाराशिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!