August 9, 2025

भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य विभागांचे नियोजन

  • धाराशिव (जिमाका) – श्री. शारदीय नवरात्र महोत्सव -2023 तुळजापूर येथे 13 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या महोत्सवाला राज्यातून व परराज्यातून भावीक व पायी यात्रीकरू चालत तुळजापूर शहरात लातूर रोड, धाराशिव रोड, सोलापूर रोड,नळदुर्ग रोड,लोहारा रोड व कर्नाटक – उमरगा रोड या मार्गाने दाखल होत आहे.भाविकांना या काळात आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले आहे.
    तुळजापूरकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर 24 तास एकूण 19 आरोग्य पथके कार्यान्वित करण्यात आली आहे.या प्रथमोपचार केंद्रावर एक समुदाय आरोग्य अधिकारी व एक आरोग्य कर्मचारी आवश्यक औषध साठ्यासह सेवा देत आहे. साथरोग प्रतिबंधात्मक पथके 10 ग्रामीण मार्गावर आणि 10 शहरी भागात नियुक्त केले आहे. प्रत्येक पथकामध्ये एक आरोग्य सहाय्यक व एक आरोग्य सेवक व परिचर यांचा समावेश करण्यात आला आहे.पथकाद्वारे यात्रा मार्गावरील व शहरातील सर्व पाणी स्त्रोत व पाणीसाठे, हॉटेल, लॉज व धाबे या ठिकाणी पाणी तपासणी करण्यात येत आहे.
    तुळजापूर शहराकडे येणाऱ्या एकूण सहा मार्गावर 3 शिफ्टमध्ये 20 मोटर ॲम्बुलन्स कार्यरत आहे.याच मार्गावर रुग्णवाहिका 24 तास प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील 102 च्या 12 आणि 108 च्या सहा शासकीय रुग्णवाहिका, शहरांमध्ये 108 च्या सात रुग्णवाहिका कार्यरत आहे.
    तुळजापूर शहरांमध्ये यात्रा कालावधीमध्ये 5 आयसीयू बेड हॉस्पिटल स्पेशालिस्ट डॉक्टर्स,सर्व औषधी व अत्याधुनिक उपकरणांसह 24 तास सेवा देत आहेत. तुळजापूर शहरांमध्ये प्रथमोपचार किटसह एकूण 20 आरोग्य सेवक आरोग्यदूत म्हणून कार्यरत आहेत. शहरात व शहराच्या एक किलोमीटर अंतरामध्ये आरोग्यदूत प्रथमोपचार किटसह पायी फिरती करून आरोग्य सेवा व आरोग्यविषयी जनजागृती करीत आहे.
    उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे सनियंत्रण व अहवाल सादरीकरणासाठी 24 तास वॉर रूम कार्यरत आहे.9 नोडल अधिकारी व 11 कर्मचारी कार्यरत आहे.यात्रा मार्गावर व तुळजापूर शहरामध्ये ठिकठिकाणी प्रसिद्धी साहित्य लावून आरोग्यविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
    महाआरोग्य शिबिर हे घाटशीळ सोलापूर रोड तुळजापूर येथे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत घाटशीळ पायथा, सोलापूर रोड तुळजापूर येथे 27 ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये तुळजापूर येणाऱ्या भाविकांना तसेच ग्रामीण भागातील जनतेची मोफत आरोग्य तपासणी व मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कालावधीत आरोग्य तपासणी, हाडांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, दंत तपासणी, हृदयरोग तपासणी, रक्तक्षय तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, चष्म्यांचे वितरण,इसीजी तपासणी, रक्तगट तपासणी इत्यादी सुविधा देण्यात येणार आहे.
    12 ऑक्टोबरपासून यात्रा मार्गावर व तुळजापूर शहरांमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्र, आयसीयू हॉस्पिटल,मोटार रुग्णवाहिका व आरोग्यदूत यांच्याकडून भाविक व यात्रेकरू यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहे.आतापर्यंत 2689 बाह्यरुग्णांवर,64 आंतर रुग्णावर आणि 15 रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात आली आहे. तुळजापूर शहरातील हॉटेल,लॉज व धाबे इत्यादी ठिकाणी दूषित पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.
error: Content is protected !!