August 9, 2025

उमेदवारांनी निवडणूकविषयक खर्चाचे अंतिम लेखे त्वरीत सादर करावे

  • धाराशिव (जिमाका) – 40 -,उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 लढलेल्या प्रत्येक उमेदवारास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम-1951 चे कलम-78 नुसार निवडणूक कालावधीमध्ये केलेल्या सर्व खर्चाचे लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील कलम-77 नुसार अचूक व परिपूर्ण लेखे निवडणूक निकाल जाहिर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणे बंधनकारक आहे.
    अचुक व परिपूर्ण लेखे सादर न करणाऱ्या उमेदवारांना भारत निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावून लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 10-अ नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाचे तसेच राज्य विधीमंडळाच्या सभागृहाचे सदस्य म्हणून निवडणूक लढविण्यास 3 वर्षासाठी अपात्र केले जाऊ शकते.
    अमुर्त निवेदनातील भाग 1 ते 4 आणि अनुसूची 1 ते 11 वर उमेदवाराने स्वत: स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.उमेदवार किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने प्रमाणित केलेल्या बँक स्टेटमेंटची प्रतही सोबत ठेवावी.प्रतिज्ञापत्रावर उमेदवाराने नमुन्यानुसार स्वत: स्वाक्षरी करावी आणि अमुर्त निवेदनासह सादर करावी.निवडणूक खर्चाचा हिशोब प्राप्त होण्याची तारीख व वेळ दर्शविणारी पावती आणि आयोगाने ठरवून दिलेली पावती त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने नेमलेल्या अधिकाऱ्याने द्यावी.रजिस्टर तपासणीच्या वेळी खर्च निरीक्षक किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निदर्शनास आणून दिलेल्या खर्चाच्या कोणत्याही वस्तूमध्ये विसंगती आढळल्यास अशा वस्तूंवरील विसंगतीच्या कारणासह स्पष्टीकरण स्वतंत्रपणे जोडावे. निवडणूक अधिकाऱ्याने बजावलेल्या नोटीसांच्या प्रती आणि निवडणूक खर्चासंदर्भात सादर केलेल्या स्पष्टीकरणाची प्रत संलग्न करावी. तरी निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे अंतिम लेखे निवडणूक निकाल जाहिर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत सादर करावे.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!