धाराशिव (जिमाका): उन्हाळ्यात पशुधनाची काळजी घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत. स्वच्छ,सुंदर हवेशीर गोठा हा दुग्ध व्यवसायाला फायदा देण्यासाठी महत्वपूर्ण आहे.उष्ण हवामानामध्ये पशुधनाचा भरपूर पाणी पिण्याकडे कल असतो. कोरडा चारा न खाणे, हालचाली मंदावणे, सावलीकडे स्थिरावणे, शरीराच्या तापमानात वाढ होणे, जोरात श्वास घेणे, भरपूर घाम येणे, दुध उत्पादनात कमी येणे, प्रजनन क्षमता कमी होणे आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणे या बाबी पशुधनामध्ये उन्हाळ्यात आढळून येतात. जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना चरण्यास सोडावे. ऊन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते. शक्यतो थंड वातावरणात त्यांना चारा टाकावा. म्हशीच्या कातडीचा काळा रंग व घामग्रंथीच्या कमी संख्येमुळे त्रास त्यांना गायीपेक्षा जास्त होतो. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घ्यावी. योग्य पशुआहार, मुरघासाचा वापर, निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करुन दिल्यास ऊन्हाळ्यातसुध्दा आवश्यक दुध ऊत्पादन मिळवणे शक्य आहे. पशु खाद्यामध्ये मिठाचा वापर व पाण्यामध्ये ईलोक्ट्रोलाईट यांचे योग्य मिश्रण करुन वापरावे. दुधाळ पशुंना संतुलित पशुआहारासोबत खनिज मिश्रणे द्यावेत. चाऱ्यामध्ये एकदम बदल करणे टाळावे. पक्षांच्या घरट्यामध्ये तापमान नियंत्रक व्यवस्था असावी. हवामानपुरक सुधारित गोठे बांधावेत. गोठ्यांची उंची जास्त असावी. जेणेकरुन गोठ्यात हवा खेळती राहील. छपराला शक्यतो पांढरा चुना/ रंग लावावा. तसेच त्यावर पालापाचोळा/तुराट्या/पाचट टाकावे. ज्यामुळे सुर्याची किरणे परावर्तीत होण्यास मदत होईल. परीसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत. मुक्त संचार गोठ्याचा अवलंब करावा. गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे, स्प्रींक्लर्स यासोबत पंख्याचा वापर करावा. दुपारच्या वेळेत गोठ्याच्या भोवती बारदाणे व शेडनेट लावावेत व शक्य असल्यास त्यांना पाण्याने भिजवावे. जेणेकरुन ऊष्ण हवा गोठ्यात येणार नाही व आतील वातावरण थंड राहील. जनावरांना मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे उपलब्ध करावे. बैलांकडून शेतीच्या मशागतीचे कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी ऊनात करुन घ्यावी. यावेळी त्यांना पाणी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार पाण्यामध्ये मिठाचा वापर करावा. कडक ऊन्हात जनावरांना चरावयास सोडू नये. पाण्याचे लोखंडी हौदामधील गरम झालेले पाणी पाजणे टाळावे. मृत जनावरांची विल्हेवाट नियमित चराऊ कुरणाच्या ठिकाणी करु नये. जनावरे दाटीवाटीने गर्दीने जवळ बांधू नयेत. ऊन्हाळ्याच्या दिवसात अनेक म्हशी साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी, तलाव, पाणथळे यात बसविल्या जातात. यातून म्हशीचे शरीर तापमान थंड ठेवण्याचा प्रयत्न होत असला तरी अस्वच्छ पाणी, वर चमकणारे ऊन रोगप्रसार यांच्या दृष्टिने चुकीचा मार्ग अवलंब होतो. त्यामुळे या बाबी टाळाव्यात. तरी ऊन्हाळ्याच्या दिवसात पशुपालकांनी पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी