कळंब – आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खराब झाल्याने कळंब तालुक्यात आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. गुरुवारी लातूर कळंब मार्गावर लातूर आगाराच्या बसवर दगडफेक केल्याने दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी वार शुक्रवारी विविध मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने आगारात शुकशुकाट निर्माण झाला होता. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहावयास मिळाले. कळंब तालुक्यातील देवळाली येथील शेकडो समाजबांधवांनी कळंब ढोकी मार्गावर रास्ता रोको करून शासनाचा निषेध केला. तालुक्यातील हावरगाव येथे रस्तत्यावर झाडी तोडून टाकण्यात आली. यामुळे चार तास या हासेगाव – इटकूर पारा मार्गावरची वाहतूक विस्कळित झाली होती. लातूर-कळंब-भाटसांगवी मार्गावर खोंदला, सत्रा परिसरातील मराठा समाज एकत्र येत खोंदला पाटीवर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालूक्यातील मोहा येथे शेकडो समाज बांधवांनी घोषणा देत चक्का जाम आंदोलन केले. यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच भंबेरी उडाली होती. गुरुवारी कळंब पासून जवळ असलेल्या खडकी गावात लातूर कळंब मार्गावर एसटी बस फोडल्याचा प्रकार घडल्यामुळे सकाळ पासून कळंब आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे महामंडळाला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. जवळपास सर्वच आगारांतून बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. दरम्यान, कळंब येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच फोटोंना काळे फासून संताप व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षण मागणीचे आंदोलन पेटू लागले आहे. आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आरक्षणाचा लढा उभा करणाऱ्या पोशिंद्याच्या जीवाला काही झालं तर सरकारला सुट्टी नाही, अशा विविध घोषणाबाजीने कळंब शहर दणाणून गेले होते. कळंब ढोकी रस्त्यावर शेकडो बांधव जमा होऊन रास्तारोको करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याजवळ मराठा समाजाने ठिय्या मांडला होता. मागील दोन दिवसांपासून आरक्षण मुद्दा पेटला आहे. त्याचे पडसाद कळंब तालुक्यातील बहुतांश गावात जोरदार उमटले आहेत. प्रत्येक जण आरक्षण मुद्दा चर्चेला घेत आहे. दरम्यान कळंब आगाराची एकही बस मार्गावर सोडण्यात आली नाही.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात