कळंब ( जयनारायण दरक) – कळंब तालुक्यातील शिराढोण येथे (दि.८) रोजी शेतीला जाण्यासाठी रस्ता पाहिजे या कारणावरून दोन चुलत भावात वाद सुरू होता. या वादावरून आज सकाळी शिलाबाई परमेश्वर यादव या महिलेस तिच्याच पुतण्याने ती घराकडे जात असताना ट्रॅक्टर खाली चिरडले. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना सकाळी दहा वाजले च्या सुमारास संगवे यांच्या पंपा समोरील तोष्णीवाल यांच्या शेतात घडली. या घटनेची माहिती अशी की परमेश्वर गोविंद यादव व बाळासाहेब विठ्ठल यादव या दोन चुलत भावात शेतात जाण्याच्या रस्त्यावरून वाद सुरू होता. या कारणावरूनदोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. भांडणामध्ये तीक्ष्ण हत्याराचा वापर झाला होता त्यावेळी दोन्ही बाजूचे काही लोक गंभीर जखमी झाले होते. त्या भांडणाचा मनात राग धरून सकाळी दहा वाजता घराकडे जाताना शिलाबाई परमेश्वर यादव या महिलेस तिचाच चुलत पुतण्या समाधान बाळासाहेब यादव यांनी ट्रॅक्टर खाली चिरडले. जीव वाचवण्यासाठी सदरील महिला उठून पळू लागली तेव्हा पुन्हा दोन ते तीन वेळा ट्रॅक्टर खाली घेतल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. उपचारापूर्वी रस्त्यातच तिचा मृत्यू झाला अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटने बाबत शिराढोण येथे नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर आरोपी समाधान बाळासाहेब यादव फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शिराढोण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेहरकर हे तपास करीत आहेत अशी माहिती गाडेकर यांनी दिली.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले