August 9, 2025

पंढरपुरात प्रा.योगेंद्र यादव यांची सभा

  • पंढरपूर – लोकांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुल्याधारीत प्रजासत्ताक आणि देशाची एकता आणि बंधुता अबाधित राखण्यासाठी राजकीय बदलापासून सामाजिक आणि आर्थिक बदलांना चालना देऊन समाजातील सर्व घटकांना एकत्र करण्यासाठी भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांची सभा दि.९ डिसेंबर २०२३ रोजी पंढरपुरात आयोजित केली असल्याची माहिती भारत जोडो अभियान महाराष्ट्राचे संयोजक ललित बाबर यांनी दिली.
    त्यांनी पुढे सांगितले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नव्हते ज्यांना या देशाचे संविधान मान्य नव्हते तेच सत्तेत आहेत. संविधानिक मूल्य सध्याच्या राजवटीत पायदळी तुडवली जाण्याचा अनुभव आपण वारंवार घेत आहोत. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, लोकशाही यंत्रणांचे खच्चीकरण सुरू आहे.देशातील अल्पसंख्यांक,आदिवासी,दलित व महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात सुरूच आहेत. एका बाजूला बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या वाटा बंद करत लोकशाही व्यवस्थाच संपवण्याचा डाव सातत्याने सुरू आहे. देशातील बेरोजगारी व विषमता शिगेला पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई,अहिल्याबाई यांचे सामाजिक न्याय, समता आणि बंधुताचे विचार नष्ट करून संविधानाने दिलेले अधिकार छुप्या पद्धतीने नाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक सामाजिक विचारवंत, साहित्यिक, कलाकार,प्रामाणिक अधिकारी दडपणाखाली असल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या नऊ वर्षात सर्व स्तरावर देशाची पीछेहाट सुरू आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. यासाठी भारत जोडो अभियान विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. देशभर परिवर्तनशील विचारांच्या लोकांना एकत्र करून मनुवादी शक्तीला विरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या माध्यमातून प्रत्येक भारतीयासाठी न्याय,स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे घटनात्मक वचन सुरक्षित राखण्यासाठी आणि जात, धर्माच्या नावावर द्वेष पसरवून देशाची एकता आणि सामाजिक सलोखा बिघडू पाहणाऱ्या आणि विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या शक्तींना सत्तेतून पाय उतार करण्यासाठी मिशन २०२४ राबवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून ९ डिसेंबर २०२३ रोजी भक्ती मंगल कार्यालय, भक्ती मार्ग, पंढरपूर येथे सकाळी ११ वाजता संविधान,लोकशाही, सामाजिक न्याय आणि २०२४ साठी आमची जबाबदारी या विषयावर सभा आयोजित करण्यात आली असून भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव मार्गदर्शन करणार आहेत.परिवर्तनशील विचारांच्या व्यक्ती संघटना यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
error: Content is protected !!