धाराशिव – धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी वार गुरुवारी समाज बांधवांनी धाराशिव शहरात मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर याठिकाणी सुमारे दीड तास आंदोलन करण्यात आले.मागणी मान्य नाही झाल्यास परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी सरकारला दिला. देशाच्या बहुतांश राज्यात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत असले तरी महाराष्ट्रातील समाज मात्र या आरक्षणापासून वंचित आहे. विविध नेत्यांनी अनेकदा आरक्षण मिळवून देण्याच्या घोषणा केल्या. मात्र,प्रत्यक्षात त्यावर कोणीही काम केले नाही,अंमलबजावणी केली नाही,असा आरोप करीत आंदोलकांनी आता घेतल्याशिवाय राहत नाही, अशी जोरदार घोषणाबाजी केली. धाराशिव शहरातील लेडीज क्लबपासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली.संत गाडगेबाबा चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,बसस्थानक,लहुजी वस्ताद साळवे चौक मार्गे हजारो समाज बांधव दुपारी दीड वाजण्याच्यासुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
काही समाजबांधवांनी धनगर समाजाची पारंपरिक वेशभूषा साकारून मोर्चात सहभागी होत लक्ष वेधले. तसेच काही आंदोलकांनी मेंढरंही सोबत आणली होती. पाट खांद्यावर धरून मोठी मेंढरं घेऊन याठिकाणी आरक्षणाच्या अनुषंगाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षणाची मागणी करणारे निवेदन समाजातील मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले, निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे हे आंदोलकांच्या विनंतीवरून प्रांगणात आले होते. त्यांनी शासनास समाजबांधवांच्या भावना कळविण्याचे आश्वासन दिले. या मोर्चात जिल्हाभरातून समाजबांधव सहभागी झाले होते. बाहेरून आलेल्या आंदोलकांनी वाहनांची सोय स्वतःहून केलेली दिसली. आंदोलनाच्या ठिकाणी सर्वानाच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आंदोलन होईपर्यंत थांबविण्यात आली होती. मोर्चाला सुरुवात होताना सर्वच आंदोलकांनी पिवळ्या टोप्या परिधान केल्या. अनेकांनी पिवळे गमजेही घातले होते. हातात घोषणांच्या पाठ्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा असलेले पिवळे झेंडे, प्रत्येकाच्या कपाळी भंडारा यामुळे आंदोलन मार्गावर जणू पिवळे वादळच धडकल्याची अनुभूती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला