August 10, 2025

उष्माघाताचा धोका वाढला; नागरिकांनी घ्यावी काळजी

  • धाराशिव (जिमाका)- गेल्या काही दिवसांत तापमानात मोठी वाढ झाली असून,त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
    उष्माघात टाळण्यासाठी पुढील उपाय करावे.यामध्ये घराबाहेर जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे.हलके,सुती आणि आरामदायी कपडे घालावेत.उन्हात बाहेर पडताना टोपी,रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. ओआरएस,ताक,लिंबूपाणी,आंबा पन्हे यांसारखी द्रवपेये सोबत ठेवावीत.
    उष्माघाताची लक्षणे प्रौढांमध्ये प्रामुख्याने शरीराचे तापमान ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढणे,तीव्र डोकेदुखी,चक्कर येणे,हृदयाचे ठोके वाढणे,मळमळ,उलटी होणे,स्नायू आखडणे हे लक्षणे तर लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार देणे,चिडचिड करणे, लघवीचे प्रमाण कमी होणे,तोंडाची त्वचा कोरडी होणे,डोळे शुष्क होणे व रक्तस्राव होणे हे लक्षणे दिसून येतात.
    उष्माघात झाल्यास प्रथमोपचार म्हणून बाधित व्यक्तीला सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे.पाण्याने अंग ओले करून पंख्याखाली ठेवावे.डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.बेशुद्ध व्यक्तीस खाण्या-पिण्याचा प्रयत्न करू नये,त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
    उष्माघाताची तीव्र लक्षणे आढळल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक १०८ किंवा १०२ वर संपर्क साधावा.जिल्ह्यातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष न करता आवश्यक खबरदारी घ्यावी व सुरक्षित राहावे,असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास व जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.
error: Content is protected !!