धाराशिव (जिमाका) – राज्यात जलसंधारणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यात येत आहे.जिल्ह्यातील अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार जिल्ह्यातील १६३ गावांची निवड करण्यात आली असून,या गावांमध्ये शिवार फेरी घेऊन जलसंधारण आराखडे तयार करण्यात आले.त्यानंतर जिल्हास्तरीय समितीच्या मंजुरीनंतर विविध विभागांच्या सहकार्याने १२५२ जलसंधारण कामे हाती घेण्यात आली आहेत. याशिवाय,अन्य योजनांमधून केली जाणारी जलसंधारण कामे देखील जलयुक्त शिवार अभियान २.० मध्ये अभिसरणाच्या माध्यमातून समाविष्ट करण्यात आली आहेत.अशा एकूण ५५६१ कामांचा समावेश करण्यात आला असून,जलयुक्त शिवार आणि अभिसरण मिळून जिल्ह्यात एकूण ६८१३ जलसंधारण कामे सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत हाती घेतलेल्या १२५२ कामांपैकी ५४६ कामे पूर्ण झाली आहेत,तर २४० कामे प्रगतीपथावर आहेत.या कामांमुळे ४३६२.३६ घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला असून,परिणामी ११९७.२९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील जलसंपत्तीची स्थिती सुधारण्यास मोठा हातभार लागणार आहे.या अभियानातून भूजल पातळी वाढवणे,शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करणे आणि दुष्काळी परिस्थिती रोखणे यासारख्या उद्दिष्टांना गती मिळणार आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी