धाराशिव – मराठा समाजाच्या राजकीय नेते मंडळींनी मराठ्यांची खानावळ चालू ठेवली आहे.त्यापैकी एक खानावळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालवीत असून तेथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपरे आहेत. तर दुसरी खनावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चालवीत असून तेथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपरे आहेत. या खणावळीमध्ये साळी,माळी, कैकाडी, दलित,आदिवासी, धनगर,मुस्लिम वर्षानुवर्षे उभे राहिले.मात्र ते उपाशीच राहिले आहेत.मराठ्यांचे पाच उमेदवार निवडणुकीला उभे असले तर ते एका रात्रीत कोणाला चालवायचा हे ठरवितात.आता बहुजनांमध्ये देखील राजकीय शहाणपणा आला आहे. त्यामुळे वंचितांचे हक्क व आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी तुळजापूर विधानसभेच्या उमेदवार डॉ.स्नेहा सोनकाटे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून देऊन आमदार करावे,असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ.स्नेहा सोनकाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी.डी शिंदे, विकास बनसोडे, डॉ.नितीन ढेपे, मिलिंद रोकडे, जीवन कदम उमेदवार डॉ.स्नेहा सोनकाटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचा चुकीचा निर्णय दिला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाजप व काँग्रेसची सरकारे पुढाकार घेत आहेत. मात्र वाढता विरोध व डोळ्यासमोर निवडणुका ठेवून त्याची अंमलबजावणी तूर्तास थांबवलेली आहे. क्रिमिलियर लागू केल्यास दलित व आदिवासी या समूहातील जातींचे वर्गीकरण करून त्यांच्यामध्ये भांडणे लावण्याचा डाव आहे. या समूहामध्ये भांडणे लागली की आरक्षणामध्ये घटना दत्त तरतूद केलेले हक्काचे आरक्षण काढून घेण्याचा भाजप व काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरक्षणाला हात लावू देणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिला. कारण आरक्षणामुळे आज वंचित घटकातील अनेकांना आपली प्रगती करता आली व येत आहे. आरक्षण गेले तर त्याचा बहुजन समाजाला प्रचंड मोठा फटका बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे ओबीसी, धनगर, आदिवासी, दलित यांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी हे आरक्षण वाचून ठेवायचे आहे असे आवाहन त्यांनी केले. तसेच मनोज जरांगे पाटील यांची चळवळ गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी उभी केली. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला. मात्र त्यांनी ओबीसी व कुणबी प्रवरगाच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केल्यामुळे आम्ही मराठ्यांना व ओबीसींना आरक्षणाचे स्वतंत्र ताट असावे ही स्पष्ट भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे ५-५ उमेदवार निवडणूक लढवीत असले तरी शेवटच्या एका रात्रीत कोणाला चालवायचे यावर एकमत व्हायचे. मात्र आता बहुजनांमध्ये देखील राजकीय शहाणपण आले असून या निवडणुकीत सर्व बहुजन समाज आपल्याच हक्कासाठी निवडणूक लढवीत असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकत्र आला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणीही थकू नका कमी पडू नका विरोधक अफवा पसरवतील त्या अफेवर विश्वास ठेवू नका. आपल्या उमेदवाराच्या काही चुका झाल्या असतील तर त्या माफ करून डॉ.सोनकाटे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी