धाराशिव (जिमाका) – आज विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी निवडणुक काळात येणाऱ्या तक्रारींची निवडणुकीत काम करणाऱ्या यंत्रणांनी तात्काळ दखल घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले. दि.१५ ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृह येथे निवडणुक यंत्रणांच्या भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचा आढावा आयोजित बैठकीत घेतांना डॉ.ओम्बासे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव,उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,उपजिल्हाधिकारी सर्वश्री संतोष भोर,उदयसिंह भोसले, संतोष राऊत,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव,जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ,श्याम गोडबोले,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बारगजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रूकमे,शिक्षणधिकारी सुद्धा साळुंखे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.तसेच चारही विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,गटविकास अधिकारी व सर्व नगरपालिका व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थिती होती. डॉ.ओम्बासे म्हणाले,निवडणुकीसाठी लागणारी वाहने तातडीने अधिग्रहित करा.सिव्हिल ॲप व कक्ष तात्काळ कार्यान्वित करा.स्थिर तपासणी पथके, फिरते तपासणी पथके व व्हिडिओ पथके तात्काळ गठीत करून सक्रिय करा. कर्नाटक राज्य सीमावर्ती भागातील बिदर व गुलबर्गा जिल्ह्याच्या सीमेवर त्वरित पथके गठीत करून सक्रिय करण्यात यावी. जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेले राजकीय पक्षांचे झेंडे,फ्लेक्स,बॅनर तात्काळ करण्यात यावे.उद्घाटन व भूमिपूजन दर्शवणारी फलके झाकून ठेवण्यात यावे.निवडणूक निर्णय अधिकारी गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी २४ तासाच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा.अर्ज १२ ड नुसार गृह मतदान करणाऱ्या मतदारांची यादी तयार करून त्यांचे मतदानाचे अर्ज भरून घ्यावे.यावेळी टपाल व गृह मतदान मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे हे मतदान व्यवस्थितपणे होईल,याची दक्षता घेण्याच्या सूचना डॉ.ओम्बासे यांनी यावेळी दिल्या. सी – व्हिजिल कक्षात येणाऱ्या तक्रारी ९० मिनिटांच्या आत निकाली काढण्यात याव्यात असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले, निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर निवडणूकविषयक प्रशिक्षणाची तारीख व वेळ निश्चित करण्यात यावी. निवडणूक निर्णय अधिकारीस्तरावर एक खिडकी योजनेतून उमेदवार व संबंधित राजकीय पक्षांना निवडणूकविषयक बाबींच्या परवानगी देण्याची व्यवस्था करावी,असे ते म्हणाले. पोलीस अधीक्षक जाधव यावेळी म्हणाले,निवडणूक काळात पुरेसा पोलीस बंदोबस राहणार आहे.विविध पथके गठीत करण्यात येणार आहेत.आंतरराज्य व जिल्ह्याच्या सीमेवर २४ तास पोलीस पथके आवश्यक त्या ठिकाणी तैनात राहणार आहे.निवडणूक काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ करण्यात येतील,असेही त्यांनी सांगितले. यादव म्हणाले,विभागस्तरावर नोडल अधिकाऱ्यांचे,जिल्हास्तरावर निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणूकविषयक प्रशिक्षण घेण्यात आले आहे.आता विधानसभा क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे दुसरी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.भरारी तपासणी पथके, स्थिर तपासणी पथके व व्हिडिओ पथके तात्काळ कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे यादव म्हणाले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी