August 9, 2025

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची प्रशासनिक गतिमानता वाढणार

  • धाराशिव (जिमाका) – श्री तुळजाभवानी देवींचे मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.गेल्या कित्येक वर्षापासून काही मोजक्याच कर्मचाऱ्यांवर मंदीर संस्थानचे कामकाज चालत होते.हे कर्मचारी राज्यासह परराज्यातील भाविकांना देखील सेवा देत होते.त्यामुळे मंदिर संस्थान प्रशासनावर कामाचा प्रचंड ताण येत होता.मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी पुढाकार घेऊन हा ताण कमी करण्यासाठी नोकर भरती प्रक्रिया राबविली.या भरती प्रक्रियेमुळे आता मंदिर प्रशासनाचा कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
    मंदिर संस्थानच्या वतीने राबविण्यात आलेल्या नोकर भरती प्रक्रियेतील ३० उमेदवारांना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते दि.९ सप्टेंबर रोजी श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची प्रशासनिक गतिमानता वाढण्यास मदत होणार आहे.
    श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात जवळपास ३३ वर्षांनी सरळ सेवेने ही नोकर भरती करण्यात येत आहे.श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने मार्च माहिन्यापासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.या भरती प्रक्रियेत सहायक व्यवस्थापक (धार्मिक),मिडिया प्रमुख,मंदीर सुरक्षा अधिकारी,जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सॉफ्टवेअर इंजिनिअर,हार्डवेअर इंजिनिअर,वायरमन,मिस्त्री,स्वच्छता निरीक्षक,सुरक्षा निरीक्षक,नेटवर्क इंजिनिअर,अभिरक्षक यासह अनेक पदांचा समावेश आहे.
    राज्यभरातील विविध जिल्ह्यातील उमेदवारांची यापदासाठी नियुक्ती करण्यात आली.तुळजाभवानी मंदीर संस्थानने ४८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरुवातीला राबविली होती. त्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिरातील कर्मचाऱ्यांची गरज ओळखून काही जागांचा समाविष्ट करून ६२ पदांना मंजुरी देण्यात आली.त्यातील काही पदांच्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले.यावेळी तहसीलदार अरविंद बोळगे,मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक (प्रशासन) तथा तहसीलदार माया माने,सिद्धेश्वर इंतूले,जयसिंग पाटील,गणेश मोटे यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.
    श्री तुळजाभवनाी मंदिर संस्थानच्या वतीने सन १९९१ या वर्षी अंदाजे २५ पदांची भरती करण्यात आली होती.त्यानंतर जवळपास ३३ वर्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्यात आली.सन २०२४ च्या भरती प्रक्रियेसाठी जवळपास १५ हजारच्या आसपास उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केले होते.त्यातील ९ हजार उमेदवार विविध परिक्षा केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षेत सहभागी झाले.श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सवानंतर रुजू झालेल्या उमेदवारांना संभाजीनगर किंवा पैठण येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी भाविकांशी सौजन्याने वागण्याचा सल्लाही यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी नवनियुक्त उमेदवारांना दिला.
error: Content is protected !!