- गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः । गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः । आज ५ सप्टेंबर ‘शिक्षकदिन’ भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस .राधाकृष्णन हे जागतिक कीर्ती मिळवणारे थोर तत्त्वज्ञ, श्रेष्ठ विचारवंत दिर्घा – नुभवी शिक्षणतज्ञ,महान पंडित,कुशल राजकारणी, न्याय प्रशासक होते . त्यांचे ‘रिलीजन इन वेस्टर्न थॉट’ हे पुस्तक संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाले . भारत सरकारने त्यांना १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव केला . १४ मे १९६२ पासून डॉक्टर राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची सूत्रे हाती घेतली .त्यांनी जवळपास १४ -१५ ग्रंथ लिहिले .त्यांचे प्रत्येक ग्रंथ जागतिक कीर्तीचे होते .राजकारणामध्ये जागतिक शांती आणि सलोखा या गोष्टीचा त्यांनी पुरस्कार केला .तसेच त्यांनी मद्रास ,म्हैसूर , ऑक्सफर्ड इत्यादी विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले .१९३१ मध्ये त्यांची आंध्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली .तसेच बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही त्यांची निवड झाली .त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये ६० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली .उपनिषदामधील तत्त्वज्ञान व हिंदी तत्त्वज्ञान या पुस्तकांनी जागतिक कीर्तीचा कळस गाठला .’आधुनिक सुधारणेतील अध्यात्मिक उणिव’ या विषयावरील व्याख्यानाच्या पुस्तकांनी जगभर प्रसिद्धी मिळवली .भारतीय शिक्षण कार्यामध्ये त्यांनी अत्यंत भरीव कामगिरी केली .शिक्षक कसा असावा याचा आदर्श घालून देणारे ते पहिले भारतीय होते .साधी राहणी उच्च विचारसरणी आणि ते एक हाडाचे चारित्र्यसंपन्न कुशल शिक्षक होते . म्हणूनच ‘नॅशनल टीचर्स फाउंडेशन’ या संस्थेने पुढाकार घेऊन १९६२ मध्ये त्यांचा जन्मदिवस .’शिक्षकदिन’ या नावाने साजरा करण्याचे ठरवले . अशा या महान भारत पुत्रास विनम्र अभिवादन !🙏
- तर सध्याच्या काळात या दिनाचा खरा अर्थ काय ? चारित्र्याचा सर्वांगीण विकास करणारा गुरु म्हणजे शिक्षक . शी =शीलवान क्ष = क्षमाशील क=कर्तव्यनिष्ठ . प्रत्येक व्यक्तीचा पहिला विश्वास हा आई वडीलांवरती असतो . आणि त्यानंतरचा दुसरा विश्वास शिक्षकांवरती असतो .कारण शिक्षक कधीही चुकीच शिकवणार नाहीत हा ठाम विश्वास शिक्षकांवरती असतो .एक डॉक्टर चुकला तर एका पेशंटचे नुकसान होते .एक इंजिनियर चुकला तर एका इमारतीचे नुकसान होते .आणि एक शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी बरबाद होते .म्हणून शिक्षक हा नेहमी बरोबरचअसला पाहिजे .शिक्षकांनी कधीही चुकता कामा नये .कारण शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आरसा असतो .कारण शिक्षकांचे विद्यार्थीअनुकरण करत असतो .शिक्षकाचं एक स्वप्न असतं की,आपला विद्यार्थी आपल्यापेक्षाही मोठा व्हावा असं त्याला वाटत असतं .आणि ज्या दिवशी आपला विद्यार्थी आपल्यापेक्षाही मोठा होतो समाजामध्ये भरपूर नवलौकिक मिळवतो त्यादिवशी त्यांची मान अभिमानाने उंचावते .तो दिवस शिक्षकाचा अत्यंत आनंदाचा असतो . तोच खरा त्याच्या आत्मसंन्मानाचा दिवस असतो ! शिक्षकाला कुठल्याही पुरस्काराची गरज नसते कारण तोच खरा त्याचा ‘ नोबेल’ पुरस्कार असतो.कारण प्रत्येक वर्गामध्ये अनेक स्तरांवरील विद्यार्थी असतात . प्रत्येक विद्यार्थ्यांमधील कलागुण हे शिक्षकाला अचूक ओळखता आले पाहिजेत .आणि आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे वर्गशिक्षक म्हणजे तर विद्यार्थ्यांचा आत्माच .विद्यार्थ्यांची नाळ ही वर्गशिक्षकांशी जास्त जोडलेली असते . आपल्या विद्यार्थ्यांना घडवणारा तो एक कुंभार असतो .मग विद्यार्थी घडवत असताना त्याचा माठ बनवायचा, रांजण बनवायचा की सुंदर नक्षीकाम केलेली सुरई बनवायची हे विद्यार्थ्याच्या अंगातील कला गुण ओळखून शिक्षकांनी ठरवायचं असतं .तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रावरती सुंदर रंग काम करणारा तो एक ‘रंगारी ‘ असतो . विद्यार्थ्यांना समरस होऊन शिकवणे यासारखे जगात दुसरे समाधान नाही .निष्पाप असतात ते विद्यार्थी .अतिशय संवेदनशील काही खोडकर तर काही बोलके काही अतिशय नम्र अशा विद्यार्थ्यांना वेळीच शासन करण आणि अबोल विद्यार्थ्यांमध्ये धाडस निर्माण करण हे त्याचं काम असत .ज्ञानदानाचे काम हे सर्वात पवित्र असं काम आहे .विद्यार्थ्याच्या बुद्धीचा हळूहळू विकास करताना अतिशय संवेदनशील व्हावं लागतं ज्याप्रमाणे एखाद्या दिव्या वरची काजळी काढताना तो दिवा तर विझला नाही पाहिजे आणि काजळी तर निघाली पाहिजे त्यानंतर जो लख्ख प्रकाश पडतो ते खरे दिवा लावण्याचे कौशल्य असते .त्याचप्रमाणे विद्यार्थी घडवताना त्याच्या संवेदनशील मनावर हळुवारपणे फुंकर घालून तशा आत्मज्ञानाचा प्रकाश उमलत्या कमळाप्रमाणे हळूहळू फुलत गेला पाहिजे .याची जाणीव शिक्षकाला असली पाहिजे . कौटिल्य नावाचा शिक्षक अर्थतज्ञ झाला .राधाकृष्णन नावाचे शिक्षक राष्ट्रपती झाले .साने गुरुजी नावांचे शिक्षक साहित्यिक , लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक झाले . सावरकर नावाचे शिक्षक देशासाठी प्राणांचे बलिदान देणारे स्वातंत्र्यवीर ठरले .त्यामुळे शिक्षक हा भूतकाळातील दुवा आणि भविष्यकाळातील दिवा असतो . गुरुची माहिती सांगताना म्हणूनच संत कबीर म्हणतात
- गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाँव । बलिहारी गुरु आपणो गोविंद दियो बताय । गुरु आणि परमेश्वर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .फक्त फरक एवढाच आहे की गुरु सदृश्य असतो आणि परमेश्वर हा अदृश्य असतो . गुरु हा जपायचा असतो आणि परमेश्वर हा जाणायचा असतो . जो समोरच्याला कमीपणाची जाणीव होऊ देत नाही तो गुरु जो लघुला ही गुरू करतो तो गुरु . आपल्यापेक्षाही आपले विद्यार्थी मोठे व्हावेत असे वाटणारा मोठ्या मनाचा एकच माणूस जगात असतो आणि तो म्हणजे शिक्षक . अशा या भावी पिढीच्या शिल्पकाराला शिक्षकदिनी माझा शतशः मानाचा मुजरा !
- 🙏🙏
शब्दांकन –
सौ.अर्चना कुलकर्णी / बावीकर .
कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल कळंब . bavikararchana6551@gmail.com
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात