धाराशिव (जिमाका) – जिल्हयातील काही भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.याचा सोयाबीन पिकावरील प्रभाव वाढल्यास जवळपास १५ ते ७५ टक्क्यापर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.त्यामुळे शेतकऱ्यांनी या रोगाच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाशी संपर्कासह तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे. सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मोझॅकचा प्रसार हा पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो.हा रोग पानातील रसामार्फत पसरतो.जर सोयाबीन पिकांच्या झाडाची पाने ही जाडसर, आखूड तसेच कडक होतात.तसेच खालच्या बाजूने सुरकुतलेली किंवा मुरगळलेली दिसून येतात.पाने साधारण पानांपेक्षा जास्त गर्द हिरव्या रंगाची दिसतात.त्याबरोबरच प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटल्याचे दिसून आल्यास हिरवा मोझॅक असल्याचे ओळखावे.सोबतच सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसून येतात,त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात.जर जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळलेली दिसल्यास पिवळा मोझॅक हा रोग असल्याचे समजून त्यानुसार उपाययोजना कराव्यात. अधिक माहितीसाठी गावातील कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क करावा.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे. सोयाबीनवरील पांढरी माशी, मावा, आणि मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन मोझॅक (केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून नष्ट करावीत. जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल.तसेच पीक तणमुक्त ठेवावे,पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये १२ इंच x १० इंच आकाराचे हेक्टरी १० ते १५ पिवळे चिकट सापळे लावावेत.त्रयुक्त खताचा संतुलित वापर करावा तसेच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या मावा व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून असिटामिप्रीड २५ टक्के + बाइफेन्थ्रीन २५ टक्के डब्ल्यूजी १०० ग्रॅम ( ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने ) (लेबल क्लेम कीटकनाशक) किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.६ टक्के झेडसी ५० मिली (२.५ मिली प्रती १० लिटर पाण्यात साध्या पंपाने) यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणात करावी.वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी