मुंबई – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी बुधवार, १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, २२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ मे २०२४ अशी आहे. सोमवार, १० जून २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १८ जून २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
More Stories
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे पैसे का अडवले?” – २०२० च्या पीकविम्यावर आमदार कैलास पाटील विधानसभेत आक्रमक
१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन