धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यातील प्रसिद्ध येडशी रामलिंगघाट अभयारण्यातील नियतक्षेत्र येडशी (उत्तर) कंपार्टमेंट नंतर 193 अंतर्गत रामलिंग मंदिर परिसरातील माकडांचा एक समूह एक एप्रिल रोजी आजारी पडल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने तात्काळ पशुधन विकास अधिकारी,येडशी यांना प्राचारण करून उपचार करण्यात आले. घटनास्थळी जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त धाराशिव यांनी घटनेच्या दिवशीच भेट देऊन त्यांच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून उपचारासंदर्भात उपाययोजना सुचविल्या.सूचनाप्रमाणे वनपरिक्षेत्र येडशी (वन्यजीव) येथील कर्मचाऱ्यांनी सर्व उपयोजना तात्काळ केल्या.
1 एप्रिल रोजी मादी माकडाचा मृत्यू झाला असता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन,धाराशिव यांनी शवविच्छेदन करून मृत पावलेल्या माकडाचा व्हिसेरा सीलबंद करून तपासणीकरिता वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केला.अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.
2 एप्रिल रोजी दोन मादी व एक नर, 4 एप्रिल रोजी एक मादी व एक नर आणि सात एप्रिल रोजी एक मादी एक नर व एक पिल्लू असे एकूण नऊ माकडे आजपर्यंत दगावली. पशुवैद्यकीय अधिकारी तसेच विभागीय वनाधिकारी वन्यजीव छत्रपती संभाजीनगर यांच्या सूचनाप्रमाणे पुढील उपाययोजना माकडांचा वावर असलेल्या भागांमध्ये करण्यात आल्या आहेत.
परिसरातील मानवी अन्न व इतर खाद्य वस्तू वन्यप्राण्यास खाण्यास देण्यास व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.तसे सूचना फलक लावण्यात आले आहे. माकडांसाठी स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी चार पाण्याच्या टाक्यांची सोय करण्यात आली आहे.जुन्या पाण्याच्या साठवण टाक्या स्वच्छ करून नेहमीच स्वच्छ पाणीपुरवठा सुरू केला आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या तज्ञांनी सुचविल्याप्रमाणे औषधीयुक्त पिण्याचे पाणी माकडांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. सर्व प्रकारचे खराब अन्नपदार्थ नष्ट करण्यात आले आहे.पशुसंवर्धन अधिकारी व त्यांचे पथक व वन्यजीव कर्मचारी सातत्याने उपचार करत आहे.या माकडांसाठी स्वच्छ व ताजी फळे उपलब्ध करून देण्यात येत आहे. विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) छत्रपती संभाजीनगर यांच्या सूचनेनुसार शेडनेटच्या सहाय्याने सावलीची सोय करण्यात आली आहे.
तसेच अज्ञात व्यक्तींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 27 (4) व 51अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून मृत माकडांचा व्हिसेरा तपासणीकरिता न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा सोलापूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच या व्यतिरिक्त इतर कोणत्या आजाराचा संसर्ग या माकडांना झाला याची तपासणीकरिता नमुने पशुसंवर्धन सह आयुक्त,रोग अन्वेषण, औंध पुणे येथे पाठविले आहे.
पाच एप्रिल रोजी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बीड यांनी पाहणी करून अधिकच्या काही उपाययोजना सुचविल्या आहेत. तसेच वरिष्ठांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनानुसार सहाय्यक वनसंरक्षक,पैठण यांच्यासह घटनास्थळी परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न वन्यविभाग करीत आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला