September 24, 2026

छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास “ शिवगर्जना ” च्या माध्यमातून होणार सादर

धाराशिव (जिमाका) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि जिल्हा प्रशासन,धाराशिव यांच्या संयुक्तवतीने 18 ते 20 फेब्रुवारी 2024 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ” शिवगर्जना ” या महानाट्याचे आयोजन तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल, धाराशिव येथे सायंकाळी 6.30 वाजता करण्यात येणार आहे.या महानाट्यात 12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत व शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिली.

” शिवगर्जना ” महानाट्याची प्रेक्षक क्षमता 10 ते 15 हजार इतकी आहे.फिरता 65 फुटी भव्य रंगमंचावर 300 कलावंत हे महानाट्य सादर करणार आहे.यामध्ये हत्ती,घोडे,उंट व बैलगाडी देखील असणार आहे.या महानाट्यामध्ये चित्तथरारक लढाया,रोमांचकारी प्रसंग,एक धगधगत्या इतिहासाची आठवण,नेत्र सुखद अतीषबाजी,खराखुरा निखळ इतिहास, मंत्रमुग्ध संगीत,नेत्रदीपक प्रकाश योजना, आकर्षक वेशभूषा, लोककला व लोकनृत्याची यथायोग्य सांगड घातलेली पाहायला मिळणार आहे.

या महानाट्यमध्ये विनायक चौगुले छत्रपती शिवाजी महारजांची भुमिका साकारत आहे.बाल शिवाजी राजेंची भुमिका सूरज कोळी साकारत असून मां जिजाऊची भुमिका दिपाली हांडे,शहाजी राजेंची भुमिका सुहास चौगुले तर अफजल खानाची भुमिका शकील पटेल हे साकारणार आहेत.या महानाट्यात 250 हून अधिक कलावंत,हत्ती,घोडे,उंट व बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे.

या महानाट्याचे निवेदक राम गुरव आणि शाहीर शुभम वाघे असतील.छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील महानाट्य ‘ शिवगर्जना ’चे विनामूल्य प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.हे प्रयोग प्रतिदिन सायंकाळी 6.30 वाजता सुरु होतील. प्रत्येक दिवशी किमान 10 हजार नागरिक उपस्थित राहतील,अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे.कार्यक्रम स्थळाची बैठक व्यवस्था,वाहनतळ,सजावट आणि सुरक्षेविषयी अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येत आहे.अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण,विजयनगरचे साम्राज्य,लखोजी राजाची हत्या, शिवजन्म,युद्ध कला व राज्यकारभार प्रशिक्षण,स्वराज्याची शपथ, अफजलखानाचा वध,पन्हाळगड वेढा,पावनखिंडीतील शौर्यगाथा, शाहिस्तेखानाची फजिती,सुरत मोहिम,कोकण मोहीम,पुरंदर वेढा, मुरारबाजीचे शौर्य,आग्रा भेट,तानाजी मालुसरेचे बलिदान आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हे प्रसंग या महानाट्यातून बघायला मिळणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास महानाट्याच्या माध्यमातून सादर होणार आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिकांनी या महानाट्याच्या लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!