August 9, 2025

विज्ञानाची कास धरा,श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका – डॉ.के. एम.क्षिरसागर

  • धाराशिव – राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,उप परिसर धाराशिवचे विशेष वार्षिक शिबिर हे खेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा आजचा तिसरा दिवस (दि. 8 फेब्रुवारी ), आजच्या दिवसाची सुरुवात ही श्रमदानाने करण्यात आली. शिबिरार्थीनी गावातील विविध भागांमध्ये स्वच्छता केली. स्वछतेच्या कामामध्ये गावकऱ्यांनी सुद्धा उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला.दुपारच्या सत्रामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रा.डॉ.के.एम.क्षीरसागर, हिंदी विभाग, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रा.डॉ.आर. बी. चौगुले, इंग्रजी विभाग प्रमुख, विद्यापीठ उप-परिसर, धाराशिव यांनी भूषविले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्ते व अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले, तसेच कार्यक्रमाची रूपरेषा विशद करण्यात आली. डॉ. के.एम. क्षीरसागर यांनी आपल्या आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला की आपण सुशिक्षित असूनही कशाप्रकारे अंधश्रद्धा पाळतो. समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. आपल्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी विविध पौराणिक दाखल्यांचा उल्लेख केला. तसेच त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विशद केले विद्यार्थ्यांनी मोबाईल वर येणारे प्रत्येक मेसेज हे खरे आहेत किंवा खोटे याची शहानिशा करून व बुद्धिमत्तेचा वापर करून त्या गोष्टींवर विश्वास ठेवावा. कोणत्याही गोष्टीचे शास्त्रीय विश्लेषण करावे जे बुद्धीला पटते त्याच्यावरच श्रद्धा ठेवावी, परंतु बुद्धीला पटत नसूनही एखादी गोष्टीवर विश्वास ठेवणे ही एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे. आयुष्य हे फार छोटे असून आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये आनंद शोधला पाहिजे व दुसऱ्यांनाही आनंद दिला पाहिजे. जगामध्ये आई-वडिलांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नसतात त्यामुळे आई-वडिलांच्या उतार वयात त्यांची काळजी करणे हे फार आवश्यक आहे.
    डॉ.आर.बी.चौगुले यांनी असे विशद केले की आपण विज्ञानाची कास धरायला हवी,आपण डोळसपणे प्रत्येक गोष्टीकडे पाहायला हवे. सर्व धर्माचे सार एकच असून आंतरिक मुक्तीसाठी आपण कोणावर तरी श्रद्धा ठेवने आवश्यक आहे. महिलांनी विशेषतः अंधश्रद्धेच्या आहारी न जाता, तसेच भोंदू साधु-संतांच्या मागे न लागता, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या मुलांवर संस्कार करणे आवश्यक आहे.
    राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक शुभांगी गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तेजश्री मुठाळ यांनी केले. या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ.आर.एम.खोब्रागडे, डॉ.जे. एस.शिंदे, डॉ.एम.के.पाटील व सर्व रासेयो स्वयंसेवक यांनी प्रयत्न केलेत.
    आजच्या तिसऱ्या सत्रामध्ये खेड येथील महिलांसाठी सायंकाळी सहा वाजता हळदी कुंकु, उखाणे स्पर्धा व संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये गावातील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला. यशस्वीतेसाठी सहकारी शिक्षिका नीता मारकल, पूर्णिमा गुंड, कविता चव्हाण, तसेच रासेयो स्वयंसेविका यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
error: Content is protected !!