April 29, 2026

“राज्य लॉटरी आमच्या हक्कांची; नाही ‘राजश्री’च्या बापाची!” — विक्रेत्यांचा एल्गार,विक्री बंदचा इशारा

  • मुंबई ( गुरुनाथ तिरपणकर) –
    राजश्री पेपर लॉटरीच्या आडून सुरू असलेल्या ऑनलाईन ‘बुक माय राजश्री’ यंत्रणेच्या विरोधात महाराष्ट्रातील लॉटरी विक्रेत्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या या ऑनलाईन विक्रीमुळे पारंपरिक विक्रेते व वितरक यांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप करत,येत्या आठवड्यात राज्यभर राजश्री पेपर लॉटरी विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    महाराष्ट्र लॉटरी विक्रेता संघटनेच्या वतीने विक्रोळी येथील सेरेनिटी ट्रेडर्स कंपनीच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन छेडण्यात आले.या वेळी “राज्य लॉटरी आमच्या हक्कांची; नाही ‘राजश्री’च्या बापाची!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. हजारो विक्रेत्यांसह अंध,अपंग, विधवा,वयोवृद्ध,बेरोजगार आणि महिलांनीही या आंदोलनात सहभाग घेत आपल्या हक्कासाठी आवाज उठवला.
    संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष विलास कृ. सातार्डेकर यांनी कंपनीवर गंभीर आरोप करत सांगितले की, ‘बुक माय राजश्री’ या ऑनलाईन यंत्रणेच्या माध्यमातून विक्रेते व वितरकांना हळूहळू बाजारातून बाहेर करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. “कंपनीने तातडीने ही बेकायदेशीर पद्धत बंद करावी, अन्यथा राज्यभर विक्री बंद करून बहिष्कार टाकला जाईल,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
    कंपनीकडून मात्र प्रियेश शाह, जयेश माणिक,मयूर लखानी, शरद जाधव यांनी “सर्व व्यवहार कायदेशीर आहेत” असा दावा करत शिष्टमंडळाला उत्तर दिले. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून पत्रव्यवहार व चर्चेनंतरही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
    संघटनेचे कार्याध्यक्ष सुमित सातार्डेकर यांनी सांगितले की, ऑनलाईन विक्रीमुळे पारंपरिक लॉटरी विक्रेत्यांची विक्री घटत चालली असून हजारो कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर आता आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
    या आंदोलनात प्रभारी सरचिटणीस कमलेश विश्वकर्मा, उपाध्यक्ष संजय नारीग्रेकर, अशोक नलावडे,मुंबई अध्यक्ष विनोद गाडेकर, सचिव संजय शेट्ये तसेच विद्याधर गायकवाड, सूर्यकांत (बाबू) धावले, उदय चेऊलकर,महेश कोळी,गणेश खैरे,ऋत्विका बोरकर,संभाजी डोंगरे,भिकाजी हांडे,जगन्नाथ परब,शांताराम पाटील, विष्णू पाटील, अॅड. दिग्विजय राणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान निदर्शकांनी राजश्री लॉटरीचे कामकाज पूर्णपणे ठप्प केले.
error: Content is protected !!