April 10, 2026

समता सप्ताहात विजय गायकवाड यांचा गौरव;संविधान उद्देशिकेने सन्मान

  • धाराशिव– महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे (दि. ८ ते १४ एप्रिल २०२६) उद्घाटन धाराशिव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे उत्साहात पार पडले.
    समता,बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित या सप्ताहात विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमात धाराशिव येथील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक व इतिहास अभ्यासक तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त विजय गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.त्यांना भारतीय संविधानाची उद्देशिका प्रदान करून गौरविण्यात आले.
  • हा सन्मान जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जात पडताळणी विभागाचे सचिव बलभीम शिंदे,सहाय्यक संचालक अमोल ताकभाते,सहाय्यक आयुक्त सचिन कवले तसेच सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून समाजात समता,शिक्षण आणि जागरूकतेचा प्रसार करण्याचे आवाहन केले.समता सप्ताहाच्या निमित्ताने पुढील काही दिवस विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
    या सन्मानाबद्दल विजय गायकवाड यांचे मित्रपरिवार, सहकारी आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत असून त्यांच्या कार्याबद्दल गौरव व्यक्त करण्यात येत आहे.
error: Content is protected !!