मुंबई ( सतिश पाटील) – कोपरी पूल येथे ८ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या क्रेन अपघातामुळे ठाणे-मुंबई पूर्व द्रुतगती महामार्ग वर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या कोंडीचा परिणाम मुलुंड पर्यंत जाणवत असून, हजारो वाहनचालक अडकले आहेत. साकेत उन्नत मार्गाच्या कामादरम्यान कोपरी उड्डाणपुलावर उभी असलेली हायड्रॉलिक क्रेन अचानक कोसळल्याने काही वेळातच संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे नोकरदार वर्गाला मोठा फटका बसला. या अपघातामुळे माजिवडा जंक्शन,तीन हात नाका,कोपरी पूल तसेच मुलुंड पूर्व परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.अनेकांना तासन्तास वाहतुकीत अडकून राहावे लागले. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना मॉडेला चेक नाका मार्गे एलबीएस मार्ग वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच,अत्यावश्यक नसलेला प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अपघातग्रस्त क्रेन हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.मात्र, परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.मेट्रो कामे,उड्डाणपुलांचे बांधकाम आणि अपुरे नियोजन यामुळे नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
More Stories
मे महिन्यात तुळजाभवानी मंदिर विकासाचा शुभारंभ;१८६५ कोटींच्या आराखड्याला वेग
मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; MRSAC कंपनीत रूपांतर, ‘महाजिओटेक’ स्थापन व IT-AI विभागाला हिरवा कंदील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डचे लोकार्पण