त्यानं स्वप्न पाहिलं आणि त्याच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम घेतले. अनेक प्रयत्नानंतर त्याचं हे स्वप्न आता पूर्ण झालं असून, देशसेवेसाठी निवडलेला मार्ग लष्करात अधिकारीपदापर्यंत घेऊन आला आहे. त्यामुळे हा क्षण केवळ स्वप्नपूर्ती करणाऱ्या ऋतुराज या तरुणापुरता मर्यादित नसून, धाराशिवकरांसाठी सुद्धा अभिमानाचा क्षण आहे. पेशाने शिक्षक असलेल्या दिलीपराव बदाले यांचा मुलगा लेफ्टनंट ऋतुराज बदाले हा डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीतून दीड वर्षाच्या अत्यंत खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर रूजू झाला आहे. त्याचे आई आणि वडील दोघेही शिक्षक असून सर्वसामान्य कुटूंबातील आहेत. ऋतुराज याची या अगोदर डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये निवड झाली होती. या मिलिटरी कॉलेजमध्ये महाराष्ट्रातून दर सहा महिन्याला देशपातळीवरील परिक्षेतून फक्त दोनच विद्यार्थ्याची निवड होत असते. त्यामध्ये ऋतुराजची निवड झाली होती. तिथून तो पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (National Defence Academy, NDA) इथे पुढील प्रशिक्षणासाठी दाखल झाला होता. तीन वर्षांचे तेथील प्रशिक्षण पूर्ण करून त्यानंतर तो परत दीड वर्ष इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथे होता. मथुरेत मिळाली पोस्टिंग डेहराडून येथे पासिंग आऊट परेड झाल्यानंतर शनिवारी तो भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून रुजू झाला आहे.त्याला पहिली पोस्टिंग मथुरेत मिळाली आहे. ऋतुराजच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्याचे आई वडिल व भावाचेही याबद्दल विशेष अभिनंदन होत आहे. तसेच ऋतुराजला त्याच्या करियरमध्ये आपल्या देशाच्या लष्कर प्रमुखपदापर्यंत जाण्याची संधी मिळो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी