धाराशिव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा )– धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदांच्या निवडीत यंदा अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळाल्या असून,अनेक दिग्गजांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे कळंब तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सदस्यांना सभापतीपदाची संधी मिळाल्याने तालुक्यात आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि.२७ मार्च २०२६ वार शुक्रवार रोजी पार पडलेल्या सभापती निवड प्रक्रियेत पारंपरिक राजकीय समीकरणांना छेद देत विविध पक्षांनी नव्या उमेदवारांवर विश्वास दाखवला.शिवसेनेच्या शिंदे गटाकडून डिकसळ गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. पुजाताई तुषार शिंदे यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीने कळंब तालुक्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. तसेच खामसवाडी गटाचे भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य विश्वास कोकणे यांची समाजकल्याण सभापतीपदी वर्णी लागली.एका तालुक्यातील दोन सदस्यांना एकाच वेळी सभापतीपद मिळाल्याने कळंब तालुक्यासाठी ही मोठी राजकीय ‘लॉटरी’ ठरल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान,तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे सिद्धेश्वर कोरे यांची अर्थ व बांधकाम सभापतीपदी निवड झाली,तर भूम-परंडा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सदस्य भाऊसाहेब खरसडे यांची कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेत सर्व नवनिर्वाचित सभापतींना प्रत्येकी ४५ मते मिळाल्याची माहिती समोर आली आहे.अपेक्षित नावांना संधी न मिळाल्याने अनेक राजकीय वर्तुळांत आश्चर्य व्यक्त होत असून, या निकालामुळे जिल्ह्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. नवनिर्वाचित सभापतींचे विविध लोकप्रतिनिधी,पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत असून,त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्रशासनातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
More Stories
जिल्ह्यातील एकही कुटुंब महिला बचत गटापासून वंचित राहू नये – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत;शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी
जनगणना २०२७ ची तयारी ३७३१ कर्मचारी सज्ज