धाराशिव (जिमाका) – आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये तसेच नगरपरिषद व नगरपंचायतींच्या स्तरावर व्यापक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.जिल्ह्यातील विविध प्रशासकीय घटकांमार्फत एकूण २८५० गणक (Enumerators) आणि ४७१ पर्यवेक्षक (Supervisors) यांची नियुक्ती करण्यात आली असून राखीव कर्मचारी धरून ही संख्या अनुक्रमे ३१९८ व ५२६ पर्यंत पोहोचली आहे.एकूण ३७३१ कर्मचाऱ्यांचा सहभाग या प्रक्रियेत राहणार आहे. तहसील कार्यालयांच्या पातळीवर धाराशिव,तुळजापूर,उमरगा,लोहारा,भूम,परंडा,वाशी आणि कळंब या आठही तालुक्यांमध्ये गणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.धाराशिव तहसील कार्यालयात सर्वाधिक ४५६ गणक व ७६ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून,तुळजापूर,उमरगा आणि कळंब या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी नेमण्यात आले आहेत.प्रत्येक तहसीलस्तरावर आवश्यक तेवढे राखीव कर्मचारी देखील ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी कार्यात खंड पडणार नाही.नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर देखील गणक व पर्यवेक्षकांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव,तुळजापूर,उमरगा,भूम,परंडा,कळंब,मुरूम,नळदुर्ग तसेच लोहारा व वाशी नगरपंचायतींमध्ये मिळून मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. नगरपरिषद धाराशिव येथे २०६ गणक व ४२ पर्यवेक्षक,तर तुळजापूर व उमरगा येथे अनुक्रमे ६४ व ७० गणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्ह्यात एकूण १८ चार्ज कार्यालये कार्यरत असून,प्रशिक्षणासाठी ८० बॅचेस आणि १८ प्रशिक्षण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.मास्टर ट्रेनर्स,फील्ड ट्रेनर्स यांचीही नियुक्ती करण्यात आली असून,सर्व संबंधितांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन जनगणना प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यावर भर दिला जात आहे.प्रशासनाने यासाठी काटेकोर नियोजन केले असून जिल्ह्यातील जनगणना प्रक्रिया अचूक व पारदर्शकपणे पार पडणार आहे.
More Stories
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत;शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार