कळंब– स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कळंब पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला एक दिवसीय तालुका स्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर माऊली निराधार बालकाश्रम,कळंब येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.या कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती सौ.राजश्री धनंजय वरपे व गटविकास अधिकारी सोपान अकेले यांचे मार्गदर्शन लाभले. तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता,कचरा व्यवस्थापन व शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत स्वच्छता मोहिमेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रशिक्षण शिबिरामध्ये ग्रामपंचायत महिला सदस्य, महिला बचत गटांच्या सदस्यांसह स्वच्छताग्रही मोठ्या संख्येने सहभागी झाले.तालुक्यातील विविध गावांमधून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती लावली,यामुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जा प्राप्त झाली. प्रशिक्षणादरम्यान सह गटविकास अधिकारी श्रीमती मनीषा सुकाळे, विस्तार अधिकारी पंचायत हनुमंत झांबरे व दत्तात्रय साळुंखे,विस्तार अधिकारी आरोग्य बाबुराव जाधव तसेच आरोग्य पर्यवेक्षक अलंकार बनसोडे व संतोष शिरशिकर, ह.भ.प.महादेव महाराज आडसुळ यांनी मार्गदर्शन केले. कचरा विलगीकरण,मैलगाळ व्यवस्थापन,सार्वजनिक स्वच्छता तसेच घनकचरा व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत अधिकारी अशोक निपाणीकर व आकाश पवार यांनी मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन ग्रामपंचायत अधिकारी अमोल सरवदे यांनी केले. यावेळी बोलताना सभापती सौ. राजश्री वरपे म्हणाल्या,“गावांचा विकास हा स्वच्छता व कचरा व्यवस्थापनावर अवलंबून आहे. महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करून प्रत्येक गाव ‘मॉडेल गाव’ बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे.” या उपक्रमामुळे ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता मोहिमेला बळ मिळणार असून महिलांच्या सक्रिय सहभागातून गावांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच या प्रशिक्षणामुळे तालुक्यात स्वच्छता व पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
More Stories
माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांचा वाढदिवस उत्साहात;ओम बहुउद्देशीय संस्थेकडून सत्कार .
साक्षी पावनज्योत परिवाराकडून आगार व्यवस्थापक विजय घोलप यांचा मानाचा सत्कार
“कळंब आगारात दुहेरी सोहळा!” नवीन आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांचा सत्कार;खताळ यांना भावपूर्ण निरोप