आज जागतिक चिमणी दिन. हा केवळ एक दिवस नसून निसर्गाशी आपल्या नात्याची जाणीव करून देणारा एक अर्थपूर्ण क्षण आहे. या निमित्ताने आपण पुन्हा एकदा आपल्या परिसराला हिरवागार,जिवंत आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेला करण्याचा संकल्प करूया. वाढती वृक्षतोड,पर्यावरणाचा ऱ्हास आणि पाण्याची टंचाई यामुळे अनेक पक्षी आणि प्राणी हळूहळू नाहीसे होत आहेत. एकेकाळी अंगणात,घरट्यांत आणि झाडांवर सहज दिसणारी छोटीशी चिमणी आज दुर्मिळ होत चालली आहे. यामागील कारणेही साधीच आहेत.तिला पिण्यासाठी पाणी नाही, खाण्यासाठी धान्य नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आढाळा येथील विद्यार्थ्यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड सर, महादेव खराटे सर,तुकाराम कराळे सर,शिवनंदा स्वामी मॅडम आणि बलभीम राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली टाकाऊ बिसलरी बाटल्यांचा उपयोग करून चिमण्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली. या छोट्याशा उपक्रमाचा मोठा परिणाम दिसून आला.दररोज शेकडो चिमण्या शाळेत येऊ लागल्या.पाणी पिऊन तृप्त होतात,परसबागेत खेळतात आणि त्यांच्या गोड किलबिलाटाने संपूर्ण परिसर आनंदाने भरून टाकतात. जणू काही “पाखरांची शाळा”च भरते! या अनुभवातून विद्यार्थ्यांना केवळ निसर्गसौंदर्याचा आनंदच नाही, तर भूतदया,प्राणीदया आणि माणुसकीचे खरे मूल्यही समजते. खरं शिक्षण हे केवळ पुस्तकांत नसून अशा कृतीतून मिळते, हेच या उपक्रमातून अधोरेखित होते. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे.पाण्याची पातळी खालावत आहे,विहिरी कोरड्या पडत आहेत,नद्या आटत आहेत.अशा परिस्थितीत अनेक पक्षी आणि प्राणी पाण्याअभावी त्रस्त आहेत. म्हणूनच,चला— 👉 आपल्या घराजवळ, शाळेत किंवा शेतात 👉 एखाद्या झाडाखाली किंवा अंगणात 👉 छोट्या पाणवट्यांची व्यवस्था करूया हा छोटासा प्रयत्नच आपल्या जिवंत माणुसकीचे प्रतीक ठरेल. चला,या जागतिक चिमणी दिनी एक वचन देऊया— चिमण्यांसाठी,पक्ष्यांसाठी आणि निसर्गासाठी काहीतरी नक्की करूया! 🌍💧🐦
— महादेव खराटे सहशिक्षक,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आढाळा 📞 9623468692
More Stories
माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांचा वाढदिवस उत्साहात;ओम बहुउद्देशीय संस्थेकडून सत्कार .
साक्षी पावनज्योत परिवाराकडून आगार व्यवस्थापक विजय घोलप यांचा मानाचा सत्कार
“कळंब आगारात दुहेरी सोहळा!” नवीन आगार प्रमुख विजयकुमार घोलप यांचा सत्कार;खताळ यांना भावपूर्ण निरोप