धाराशिव (जिमाका) – सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलन शुभारंभ व ध्वजदिन 2022 उत्कृष्ट संकलन केलेल्या कार्यालयास प्रमुखांनी पारितोषिक वितरनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात दि.8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयाचे प्रमुख, विविध संस्था, शाळा व महाविद्यालयाचे प्रमुख प्रतिनिधी, वीर नारी, वीर माता/पिता, माजी संघटनांचे प्रतिनिधी व माजी सैनिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.मेजर मिलिंद तुंगार यांनी ध्वजदिनाचे महत्त्व तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी ध्वजदिन 2023 निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते करण्यात आला.यावर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी जिल्ह्यासाठी मागील वर्षाप्रमाणे 51 लक्ष 28 हजार रुपये इतके उद्दिष्ट ठरवून दिले आहे.हे उद्दिष्ट वेळेत पुर्तता करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्वांना आवाहन केले. देशाच्या संरक्षणासाठी जवान प्रतिकुल परिस्थितीमध्ये सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना शहीद होतात.अशा शहीद जवानांच्या कुटुंबियांना जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे,त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या सैनिकांसाठी या निधी संकलनात सर्वांनी योगदान दयावे.असे आवाहन डॉ.ओम्बासे यांनी केले. शासनाने धाराशिव जिल्ह्यास सन 2022 या वर्षासाठी 51 लक्ष 28 हजार रुपये इतके निधी संकलनाचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट 1 कोटी 18 लक्ष 42 हजार म्हणजे 231.84 टक्के उद्दिष्टपूर्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ कुलकर्णी व आभार अनिलकुमार मेंगशेट्टी यांनी मानले. जिल्हा सैनिक कार्यालयाचे साहेबराव वाघमारे, माजीद काझी, शैलेश देव, सुधाकर परशे, प्रकाश अडगळे, उमेश राठोड, कोमल उंबरे व छाया देडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी