धाराशिव – जिल्ह्यातील महिलांनी शिक्षण,आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सहभागातून सक्षम व्हावे तसेच राजकीय क्षेत्रातही पुढे येऊन नेतृत्व करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय धाराशिव, महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद धाराशिव आणि महिला आर्थिक विकास महामंडळ धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.९ मार्च २०२६ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार होत्या.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी काळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) देवदत्त गिरी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे (परंडा),बाल विकास प्रकल्प अधिकारी रेश्मा पठाण (धाराशिव) तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रकल्प समन्वयक सुखदेव चिंचोलीकर उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले की,महिला ही कुटुंबाचा आधारस्तंभ असून तिच्या शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो.महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून संघटित होऊन आर्थिक स्वावलंबन मिळवावे.महिला आर्थिक विकास महामंडळ व ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून बचत गट स्थापन करून महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
महिलांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःसह आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करावी तसेच स्वतःमधील सुप्त गुणांना वाव देत समाजात आपले स्थान निर्माण करावे, असेही त्यांनी नमूद केले. उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून महिलांचे मनोबल वाढवले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सुमारे ३०० महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेण्यात आली. बालविवाहाबाबत माहिती मिळाल्यास १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर तसेच महिला हिंसाचारासंदर्भात १८१ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजना तसेच सामाजिक कायद्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली आव्हाड (शहर अभियान व्यवस्थापक, नगर परिषद धाराशिव) यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रियंका जाधव (केंद्रप्रशासक, सखी वन स्टॉप सेंटर धाराशिव) यांनी केले. हिंसाचारग्रस्त महिला व बालकांनी मदतीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,कक्ष क्र.२७,धाराशिव येथे संपर्क साधावा,असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
More Stories
पत्रकारांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषद धाराशिवचा पुढाकार
राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांसाठी मार्गदर्शक तत्वे; जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभारता येणार नाही
परंड्यात १३ मार्चला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा