कळंब – कळंब नगरीतील विरशैव संप्रदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिर येथे महाशिवरात्र उत्सव १३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. पंचक्रोशीतील हजारो भगवान शिवशंकर प्रेमी भाविकांनी उत्सवात सहभाग घेत मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला. मन्मथ माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जन्मभूमी तीर्थक्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय शिवलीला अमृत ग्रंथ पारायण मोठ्या श्रद्धेने पार पडले. पारायण प्रमुख म्हणून शि.भ.प. राजाभाऊ महाराज खरबड यांनी मार्गदर्शन केले. महाशिवरात्र दिनी दिवसभर वैजिनाथ आप्पा भडंगे यांच्या वतीने फराळाची पंगत झाली. सायंकाळी पारंपरिक पद्धतीने शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. बाळासाहेब मिटकरी यांच्या शुभहस्ते शंकर-पार्वती दाम्पत्य पूजा करण्यात आली.तसेच काशी विश्वनाथ महादेव पिंडीस महाअभिषेक करण्यात आला. वीरशैव आणि मन्मथेश्वर महिला भजनी मंडळांनी रात्री उशिरापर्यंत शिवभजन जागर सादर करून वातावरण भक्तिमय केले. दुसऱ्या दिवशी सोमवारी पारण्याच्या निमित्ताने शि.भ.प. सौ.भाग्यश्रीताई स्वामी (तत्तापूरकर) यांचे प्रभावी शिवकीर्तन झाले. कीर्तनानंतर मच्छिंद्र आप्पा कावळे, सुनील हिरे व विशाल राजमाने यांच्या वतीने दिवसभर प्रसादाची पंगत देण्यात आली. या उत्सवप्रसंगी लिंगायत संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रआबा मुंडे,सेवाभावी संस्थान पंचकमिटी अध्यक्ष सागर मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.मंदिराचे पुजारी शैलेश स्वामी व कार्यकर्त्यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत, धार्मिक उत्साह आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत महाशिवरात्र उत्सव मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
More Stories
कळंबमध्ये ‘काव्य मैफिल’ व विज्ञानाधारित चमत्कार सादरीकरण;अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृतीचा उपक्रम
आंबेडकरी विचारांचा प्रभाव; कुणाल जगतापची सैनिक स्कूल साताऱ्यात झेप
कौशल्याधिष्ठित शिक्षण हीच काळाची गरज – डॉ.अशोकराव मोहेकर