March 28, 2026

प्लास्टिक वाणाला फाटा! धाराशिवात हळदीकुंकवाला पालेभाज्यांचे वाण देत अनोखा उपक्रम

  • धाराशिव– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने आरोग्य,पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक दायित्व या अनुषंगाने खास महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे,मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांना दिल्या जाणाऱ्या पारंपारिक प्लास्टिक वाणाला पूर्णतःफाटा देत आरोग्यदायी व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.
    संस्थेच्या संचालिका सोनाली होळकर यांनी शहरातील गणेशनगर वामन सिटी येथील होळकर पॅलेस येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी प्लास्टिक वस्तू वाण म्हणून देण्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांकडून मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर अशा विविध पालेभाज्या विकत घेऊन त्या महिलांना वाण म्हणून वाटप केले. त्यामुळे महिलांसह उपस्थितांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
    तिळगुळ वाटप करताना देखील यामध्ये काळे तीळ व गूळ याचा वापर करून आरोग्याचा संदेश देण्यात आला.तसेच चहापान टाळून देशी उसाचा रस पेय म्हणून देण्यात आला.
    या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य-पर्यावरण-सामाजिक दायित्वाची प्रतिज्ञा उपस्थित महिलांकडून वदवून घेण्यात आली. समाजात पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी परंपरा रुजावी यासाठी हा अनोखा प्रयोग यशस्वी करण्यात आला.
    यावेळी धाराशिवच्या नगराध्यक्ष नेहा ताई काकडे,नगरसेविका सोनाली वाघमारे,ज्ञानेश्वरी निकम, जिमच्या संचालिका मनिषा डोलारे,साई श्रद्धा क्लासेसच्या संचालिका उषा लांडगे तसेच अहिल्या सखी मंच धाराशिव यांच्या सदस्यांनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून संस्थेच्या नवोपक्रमास शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!