August 9, 2025

गृहप्रवेशाचा मान विधवांना;कोल्हापुरात पुरोगामी पाऊल

  • कोल्हापूर (राजेंद्र बारगुले यांजकडून) – वास्तूचा गृहप्रवेश करताना सुवासिनी महिलांना सन्मान देण्याच्या परंपरागत प्रथेला छेद देत कोल्हापुरातील एका शासकीय अधिकाऱ्याने विधवांच्या हातून बुधवारी दि.६ डिसेंबर २०२३ रोजी गृहप्रवेशाचे विधी केला.
    या कृतीने त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरच्या मातीत नवा पायंडा पाडला आहे.सण समारंभ,उत्सव, विवाह सोहळा असेल तर विधवांना गौण स्थान दिले जाते. हळदी- कुंकू,मान- सन्मान यापासून त्यांना दूर सारले जाते . अलीकडे समाजातील अनिष्ट रूढी परंपरांचा पगडा कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.काही दिवसांपूर्वीच शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक ठराव करून रूढी परंपरांना मूठमाती देण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तूचा गृहप्रवेश करताना सात सुवासिनींचे पूजन करून त्यांना जेवण देत नव्या वास्तूत पंगत बसवण्याची परंपरा या भागात गेली अनेक वर्ष सुरू आहे. तिला छेद कसबा बावडा येथील वितरण अधिकारी दीपक वावरे यांनी दिला.
    त्यांच्या आई उमा वावरे यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. आईच्या स्वप्नातील घर साकारलेल्या वावरे यांनी घराचा गृहप्रवेश करण्याचे ठरवले. सुवासिनी भोजनाची प्रथा आहे, अशी माहिती त्यांना नातेवाईकांकडून मिळाली. मात्र, माझी आई जिवंत असती तर तिलाही यापासून दूरच राहावे लागले असते असा विचार वावरे यांच्या मनात आला. त्यांनी सुहासिनी ऐवजी विधवांना सन्मान देण्याचा निर्णय घेतला. याला कुटुंबीयांनी पाठबळ दिले.
error: Content is protected !!