धाराशिव (जिमाका) – युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा,संस्कृती व परंपरेचे जतन व्हावे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ व्हावी,या उद्देशाने शासनामार्फत दरवर्षी जिल्हा,विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिवतर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ चे आयोजन २० व २१ नोव्हेंबर २०२५ रोजी पुष्पक मंगल कार्यालय, आकाशवाणी केंद्राजवळ,धाराशिव येथे करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये “नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन)”, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम — समूह लोकनृत्य,समूह लोकगीत,कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कथालेखन,चित्रकला,वक्तृत्व व कविता लेखन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या युवा महोत्सवात १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात.सहभागासाठी जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला आणि जिल्ह्याचे रहिवासी असल्याचे प्रमाण म्हणून आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी आपली नावनोंदणी दि.१८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत करावी.अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव येथे प्रत्यक्ष सादर करता येईल किंवा districtsports.osmanabad@gmail.com या ई-मेलवर पाठवता येईल. अधिक माहितीसाठी अक्षय बिरादार, क्रीडा अधिकारी (मो. 8830374805) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य