February 8, 2026

मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाची धाराशिव शाखेची बैठक संपन्न

  • शिक्षण,सामाजिक प्रश्न आणि आंबेडकरी विचारांवर सखोल चर्चा
  • धाराशिव – मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाची धाराशिव शाखेची बैठक दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी धाराशिव येथे उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.राम चंदनशिवे होते.
    या बैठकीत ७ नोव्हेंबर १९०० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. भविष्यात हा दिवस शहरातील मोठ्या मैदानावर सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
    या दिवशी परमपुज्य डॉ.बाबासाहेबांनी सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूलमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेतला होता.शिक्षणाच्या माध्यमातून बहिष्कृत समाजातील मूल भारतरत्न व संविधानाचे शिल्पकार बनले,हा इतिहास समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले.त्यामुळे आजच्या पिढीने शिक्षणाचा ध्यास घेऊन नकारात्मकता सोडली पाहिजे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
    बैठकीत सध्याच्या महाराष्ट्रातील शिक्षण,सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय व्यवस्थेतील मागासवर्गीय समाजाचे स्थान,तसेच दररोज घडणाऱ्या घटनांचा समाजावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर चर्चा झाली. समाजातील प्रश्नांवर केवळ प्रतिक्रिया न देता त्यांचे उत्तर शोधून कार्यवाही केली पाहिजे,अशी भूमिका उपस्थित सदस्यांनी मांडली.
    आज आपण निष्क्रिय राहिलो,तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही,”असा निर्धार यावेळी उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.अनंत लांडगे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य उल्लेखनीय होत असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.
    या बैठकीस पी.आर.शिंदे,प्रभाकर बनसोडे,प्रा.राम चंदनशिवे,अरुण भाऊ बनसोडे,अशोक बनसोडे, बाळासाहेब माने,बलभीम कांबळे, सुनील बनसोडे,व्ही.एस. गायकवाड आदींची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. एस. गायकवाड यांनी केले,तर आभार प्रदर्शन पी.आर.शिंदे यांनी केले.
error: Content is protected !!