February 9, 2026

नगरपरिषद निवडणुकीदरम्यान जात,धर्म वा भाषावार शिबिरांवर बंदी — जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

  • धाराशिव (जिमाका) – राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम घोषित केला आहे.हा कार्यक्रम घोषित झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जात,धर्म आणि भाषावार शिबिरे किंवा मेळावे आयोजित करण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.
    या संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी नमूद केले आहे की, निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारचे जात,धर्म किंवा भाषावार शिबिर,सभा किंवा मेळावे आयोजित केल्यास समाजात तणाव निर्माण होऊन निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.त्यामुळे अशा कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
    जिल्हाधिकारी पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची खात्री झाल्याने हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
    या आदेशानुसार,जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीत जात,भाषा किंवा धार्मिक स्वरूपाचे कोणतेही शिबिर, मेळावा किंवा तत्सम कार्यक्रम आयोजित करण्यास 3 डिसेंबर 2025 पर्यंत बंदी राहील.हा आदेश संपूर्ण जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीत 4 नोव्हेंबर 2025 ते दि.3 डिसेंबर 2025 या कालावधीत लागू राहणार आहे.
error: Content is protected !!