घराला घडवणाऱ्या,प्रेमाचं छत देणाऱ्या,आमच्या प्रत्येक यशात ज्यांचं मूक योगदान होतं — त्या सासूबाई आज दूर गेल्या असल्या, तरी श्वासांच्या प्रत्येक स्पंदनासह त्या माझ्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील! माझ्या सासूबाई श्रीमती प्रतिभाताई बावीकर यांना जाऊन आज सहा महिने झाले. त्यांच्या असंख्य आठवणी हृदयात हिंदोळे घेत आहेत. ‘प्रतिभा’ — या नावातच सामर्थ्य होतं. नावाप्रमाणेच त्या अत्यंत प्रतिभावान होत्या. सांगोला येथील ठोंबरे घराण्यातील एका आदर्श शिक्षकांच्या त्या कन्या.लग्नानंतर माझे आदर्श सासरे कै. प्रभाकरराव बावीकर यांच्या संसारात त्या ‘प्रतिभा’ बनून आल्या. माझे सासरेदेखील मराठी विषयाचे शिक्षक असून सर्वश्रुत, बहुआयामी व्यक्तिमत्व होते. काही काळ ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालकही होते. या दोघांच्या संसारवेलीवर चार फुले बहरली. मात्र, एकाएकी दृष्ट लागल्यासारखं झालं. लग्नानंतर २०–२२ वर्षांनी, गणेश चतुर्थीच्या दिवशी ट्यूशन घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने सासरे देवाघरी गेले. ऐन तरुण वयात चारही लेकरं सांभाळत, त्या माऊलीने स्वतःच्या संसाराचा रथ ३५ वर्षे खंबीरपणे ओढला. पतिनिधनाचं दुःख मनात गिळून, त्यांनी कधीही आपल्या मुलांसमोर अश्रू दाखवले नाहीत — असं हे धैर्यवान आणि करारी व्यक्तिमत्व! स्वतःच्या दोन मुलांना आणि दोन मुलींना उत्तम संस्कार देऊन त्यांनी घडवले. आज ती सर्व मुलं स्वावलंबी आहेत. प्रेमळ आई, खंबीर पत्नी, आदर्श शिक्षिका, सुशिक्षित आजी, समंजस सासू, मायाळू बहीण आणि सुसंस्कृत समाजशील व्यक्ती — अशा विविध भूमिका त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. कळंब आणि धाराशिव जिल्ह्यातील डिकसळ, आंदोरा आदी ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून सेवा दिली. गणित विषयाच्या त्या अत्यंत पारंगत शिक्षिका होत्या. वेळेची काटेकोर शिस्त, प्रामाणिकपणा, काटकसर, स्वाभिमान आणि परोपकार हे त्यांचे स्वभावगुण होते. पश्चिम महाराष्ट्रातील सांगोला हे माहेर असूनही मराठवाड्यात येऊन त्यांनी अनेक अडचणींना सामोरे गेले, पण कधीही त्याचा उहापोह केला नाही. स्वतःच्या पगारातील एक रुपयाही स्वतःसाठी खर्च केल्याचं आठवत नाही. सासरे गेल्यानंतर त्यांनी त्यागमय आणि निरासक्त जीवन जगलं. नातवंडांवर त्यांना जीवापाड प्रेम होतं.सर्व नात्यांमध्ये त्या आपलेपणा आणि जिव्हाळा जपून राहत. समाजातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या, शेजारी–पाजाऱ्यांशी घट्ट नाती राखणाऱ्या अशा त्या सर्वांच्या ‘आई’ होत्या. शिक्षणाबद्दल त्यांना अपार प्रेम होतं. होतकरू विद्यार्थ्यांना त्या नेहमी मदत करत. चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी स्वतः पेढे घेऊन कौतुक करायला जात असत. वयाच्या ८५व्या वर्षीही त्या शिवणकाम करत असत; आणि ८९ व्या वर्षीही त्यांची स्मरणशक्ती अत्यंत तल्लख होती.
“प्रत्येकाने स्वतःची कामे स्वतः करावीत,” हा त्यांचा जीवनमंत्र होता. शिस्त, स्वावलंबन आणि जीवनातील समतोल यांवर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या घरात नेहमी लोकांची वर्दळ असे. संघाचे कार्यकर्ते, समाजसेवक, राजकीय नेते, अधिकारी, डॉक्टर, शिक्षक — असंख्य लोक त्यांना भेटायला येत असत. कळंबमधील नामांकित डॉक्टर, प्राध्यापक आणि विद्यार्थी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत. त्यांच्या उपचारांसाठी कोणीही फी घेतली नाही — हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक आहे. त्या म्हणायच्या, “देवाने हात–पाय धड ठेवावेत, कोणावर ओझं व्हायचं नाही.” शेवटच्या काळात मुलांनी आणि मुलींनी त्यांची अतोनात सेवा केली. आमचं घरच जणू ‘इमर्जन्सी केअर युनिट’ बनलं होतं. माझे यजमान श्री. संदीप बावीकर यांनी त्यांच्या प्रत्येक इच्छेचा सन्मान केला. नवरात्रात रोज देवीचं दर्शन घडवणं, जुने मित्र–मैत्रिणी भेटवणं, डॉक्टरांकडून नियमित तपासणी — हे सर्व जिव्हाळ्याने चालू होतं. डॉक्टर अभिजीत लोंढे, डॉ. कोरसाळे, श्री. संभाजी कोळी, शिंदे मामा यांनी त्यांच्यावर केलेली सेवा आम्ही कधीही विसरू शकत नाही. वयाच्या उत्तरार्धात त्यांनी अत्यंत शांततेत आयुष्य व्यतीत केलं. खरंच, धन्य ती माऊली आणि धन्य ती मुलं! सासूबाई म्हणजे फक्त नातं नाही — तर त्याग, प्रेम, समजूत आणि मायेचं दुसरं नाव होतं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणाऱ्या, हसतमुखाने दुःखाचा डोंगर अंगावर घेऊन लेकरांचं रक्षण करणाऱ्या या माऊली आता आमच्यात नाहीत; पण त्यांची उब, त्यांचे शब्द, त्यांची शिकवण आमच्या हृदयात कायम आहे. सर्व मुलं–मुलींना एकत्र ठेवणारा हा एकखांबी तंबू काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्याने घराची प्रत्येक भिंत ओसाड वाटते. त्यांच्या प्रेमाचा सागर, त्यांची माया, त्यांचा मायेचा हात — यांची उणीव आजही बोचते. आई, याल का पुन्हा एकदा — प्रेमाचा अथांग सागर घेऊन, आम्हा सर्वांच्या जीवनात पुन्हा एकदा मायेचा हात फिरवायला…
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड