मंत्री गोगावले यांची शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्याशी चर्चा
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, पिके,पशुधन यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतरस्तेही वाहून गेले आहेत.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेतरस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हाप्रमुख साळुंके यांनी मंत्री गोगावले यांच्यासमोर धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा मांडला.नदीकाठच्या गावांमध्ये पिकांसह माती वाहून गेली असून पशुधनासाठी साठवलेला चारा व अनेक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. ऐन दिवाळी व रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे, असेही त्यांनी नमूद केले. शासनाकडून जाहीर झालेल्या मदतीव्यतिरिक्त शेतरस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. या मागणीवर मंत्री भरतशेठ गोगावले यांनी वाहून गेलेल्या शेतरस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी निधी देण्याचा शब्द दिला, अशी माहिती जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिली. या भेटीवेळी शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य