अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत, कर्जमाफी व सोयाबीनला १० हजार भाव देण्याची मागणी
मराठवाडा – सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मराठवाडा प्रदेशातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अतिवृष्टी हे एक आस्मानी संकट असल्याने शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांकडे सविस्तर मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे. सध्या जाहीर करण्यात आलेली मदत तुटपुंजी असल्याने त्यात वाढ करून विमा नुकसानभरपाई हेक्टरी ५८,००० रुपये आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. पशुधनाच्या नुकसानीबाबत जाहीर रक्कम अपुरी असल्याने ती वाढवावी, तसेच रब्बी पेरणीसाठी हेक्टरी ४०,००० रुपये मदत द्यावी. शेतकऱ्यांचे वीज बिल व कर्ज तात्काळ माफ करावे, शेतीतील कामे रोजगार हमी योजनेद्वारे करून घ्यावीत, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. याशिवाय बेरोजगार तरुण व शेतमजूरांना दरमहा ५,००० रुपयांचा भत्ता, विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करून त्यांच्या निवास व भोजनाची मोफत सोय, तसेच नुकसानग्रस्त उद्योजकांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशीमागणीही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला न्याय्य दर मिळावा यासाठी सोयाबीनला प्रति क्विंटल १०,००० रुपये भाव द्यावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली धरणे, कालवे तातडीने दुरुस्त करावेत, तसेच पंतप्रधान आवास योजनेतून बेघर झालेल्यांना घरे बांधून द्यावीत, अशी मागणी परिषदेने केली आहे. अतिवृष्टीग्रस्त परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक संभाजीनगर येथे घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर धर्मवीर कदम, प्रा. अर्जुन जाधव, सुरज शेळके, विजय गायकवाड, सागर जाधव, शामराव लावंड, दिपक बारकुल, प्रा. धनंजय लोंढे, नवनाथ पवार, युनुस पटेल, अमोल घोगरे, डी.एम. पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य