February 9, 2026

शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंना न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा रस्त्यावर उतरू– आमदार कैलास पाटील यांचा इशारा

  • धाराशिव — धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या भीषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील शेलगाव (ज), सातेफळ, वाघोलीसह विविध गावांना भेट देऊन शेतकऱ्यांची प्रत्यक्ष व्यथा जाणून घेतली.
    या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख, डोळ्यांतील अश्रू आणि उद्ध्वस्त झालेले संसार पाहून तीव्र संताप व्यक्त केला. आमदार पाटील म्हणाले –
    “मायबाप सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
    शेतपिकं उद्ध्वस्त, जनावरांसाठी चारा नाही,घरे आणि संसार पाण्यामुळे उद्ध्वस्त, त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही, याबद्दल आमदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
    मदतीत दुजाभाव का?
    ऑगस्ट महिन्यात इतर जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात आली, मात्र धाराशिव जिल्हा मात्र वंचित राहिला आहे. “जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत न देणे हा उघड दुजाभाव असून, सरकारचं शेतकऱ्यांप्रती असलेलं ढोंगी प्रेम यावरून स्पष्ट होत आहे,” असा टोला पाटील यांनी लगावला.त्यांनी पुढीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत.तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी,शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, जनावरांसाठी चाऱ्याची सोय करावी.सरकारने या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल,असा ठाम इशारा आमदार कैलास पाटील यांनी दिला.
error: Content is protected !!