कळंब – येथील ग्रामीण,जातीवंत आणि गुणवंत कलाकार विलास गंदुरे वय-४५ हे दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता कळंब- बार्शी रोडवर फिरायला गेले असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर अज्ञात वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी झाले. सामाजिक कार्यकर्ते हर्षद अंबुरे यांना फोन वरून माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन अँम्बूलंस उपलब्ध न झाल्याने स्वतःच्या रिक्षाने सरकारी दवाखाण्यात दाखल केले.परंतु ठरल्याप्रमाणे व कळंब रूग्णालयाच्या अलिखित नियमानुसार थातूर-मातूर पट्टी बांधून अंबाजोगाईला रेफर करण्यात आले.विलास गंदूरेचे यांच्या डोक्याला मार लागला असल्यामुळे अंबाजोगाई पर्यंत रक्तस्त्राव सुरूच होता.तीन दिवस मृत्यूशी झुंज देवून अखेर दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.०० च्या दरम्यान विलास यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील,एक भाऊ,पत्नी,एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.सायंकाळी ७.४५ वाजता कळंब येथील मांजरा काठच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी कळंब येथील नागरिक, कलावंत मंडळी,नातेवाईक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळंब नगरीतील लोकप्रिय व बहुआयामी कलावंत कै.विलास गंदूरे यांनी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष द.घोडके लिखित “शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी जीवन संग्राम” या लघुपटात त्यांनी साकारलेली भूमिका केवळ अभिनय नव्हती,तर ती त्यांच्या कलेतील समर्पणाची जिवंत साक्ष होती,त्यांचा एक चित्रित प्रसंग…! त्यांचे योगदान आमच्या हृदयात सदैव अमिट राहील.संस्थेच्या वतीने या अविस्मरणीय कलावंतास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. विलास यांना धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा तपास करून विलास गंदुरे यांच्या नातेवाईकांना न्याय द्यावा व सरकारी दवाखान्यात ट्रामा केअर सेंटरची तात्काळ सोय करावी अशी मागणी हर्षद अंबूरे यांनी केली आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड