विश्वरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक परिवर्तनाचे महान शिल्पकार.परंतु त्यांच्या आयुष्याच्या,संघर्षाच्या,आणि यशाच्या वाटचालीतील एक अविभाज्य,पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेलं पात्र म्हणजे रमाई आंबेडकर — त्याग, समर्पण,आणि ममतेचं मूर्तिमंत उदाहरण.
माता रमाई यांचा संपूर्ण जीवनप्रवास म्हणजे एका स्त्रीने समाजहितासाठी स्वतःच्या सुखांचा त्याग करण्याची अनोखी आणि प्रेरणादायी कहाणी. बालवयात लग्न,अर्धशिक्षित असतानाही प्रगल्भ समज, आणि डॉ.बाबासाहेबांसारख्या महान विचारवंताच्या जीवनात खंबीर पाठीराखी म्हणून रमाई यांचं स्थान अनन्यसाधारण ठरतं.
आज रमाई आंबेडकर यांचा स्मृतीदिन.तो केवळ त्यांच्या निधनाची तारीख म्हणून नव्हे, तर एका क्रांतिकारी स्त्रीच्या कार्याची आठवण म्हणून साजरा व्हायला हवा.डॉ.बाबासाहेबांचा समाजासाठीचा लढा अनेक अडथळ्यांनी भरलेला होता.त्या काळात एका स्त्रीने,समाजाच्या तिरस्काराला न जुमानता, आपल्या पतीच्या कार्याला जीवन मानलं,हेच मुळात क्रांतीकारक होतं. रमाई यांच्या जीवनातील वेदना अगणित होत्या — आर्थिक ताण, लेकरांचे मृत्यू, डॉ.बाबासाहेबांचा व्यस्त आणि अनेकदा अनुपस्थित राहणारा सहवास,आजारपण आणि सामाजिक अपमान.पण या साऱ्याला न खचता,त्या स्थिर राहिल्या.डॉ.बाबासाहेब जेव्हा थकले,तेव्हा त्यांना उभं करणारी माऊली रमाई होती. “रमाई नसती,तर डॉ.बाबासाहेबही नसते” — हे विधान केवळ भावनिक नव्हे,तर वास्तवदर्शी आहे.रमाई म्हणजे घराचा कणा,पण तिचा प्रभाव राष्ट्रीय स्तरावर होता.ती केवळ डॉ.बाबासाहेबांची पत्नी नव्हती, तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ‘आई’ होती.
आज समाजात स्त्री सक्षमीकरणाबाबत बोललं जातं. पण रमाईने साक्षात कृती करून दाखवलेली भूमिका हे त्याचं मूळ बीज आहे.त्यांनी न फुलवलेलं स्वप्न आज आपण फुलवायला हवं. रमाई यांच्या स्मृतीदिनी,त्यांचं कार्य,त्याग आणि जीवनदृष्टी यांचा विचार करून आपण फक्त अभिवादन करून थांबू नये. त्यांच्या आदर्शांनी समाजात समानता, समर्पण, आणि सहकार्य यांचं नवं पर्व उघडायला हवं.
९ कोटी लेकरांची माऊली,त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस कृतज्ञता,आदर आणि कोटी कोटी नम्र अभिवादन!
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात