August 9, 2025

तेरखेड्याच्या सुतळी बॉम्बमुळे ध्वनी प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ !

  • तेरखेडा (जयनारायण दरक यांजकडून ) – वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील सुतळी बाॅम्बमुळे ध्वनी प्रदूषण वाढत असून लहान मुलांना या आवाजामुळे कमी ऐकायला मिळत आहे. तर ह्रदय रोगी असलेल्या रुग्णांना याचा नाहक त्रास होत असल्यामुळे फटाका बनवणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करण्यात यावी अशी परिसरातील नागरिकांतून होत आहे. मात्र या मागणीकडे ध्वनी प्रदूषण विभाग किंवा जिल्हा प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करून डोळेझाक करीत असल्यामुळे हा प्रदूषणाचा धमाका आरोग्यास घातक व अत्यावश्यक नाजूक अवयवांची हानी करण्यास कारणीभूत ठरत आहे.
    धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा हे गाव फटाक्यांची उत्तर काशी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. तेरखेडी फटाके मोठा आवाज देतात म्हणून राज्यातील ग्राहक, दुकानदार मोठ्या प्रमाणात तेरखेडा येथे फटाका खरेदीसाठी येतात. विशेष म्हणजे दिवाळी उत्सवात ५० कोटी तर वर्षभरात १०० कोटी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत असते.
    सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या गावात फटाका उत्पादनासाठी महसूल प्रशासनाने ४२ कारखानदारांना परवाना दिलेली आहे. मात्र प्रत्यक्षात मात्र १०० पेक्षा अधिक कारखानदार फटाका उत्पादन घेतात.
    येथे बनतात फटाकासह सुतळी बाॅम्ब
    धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा, गोजवडा, चोराखळी, इंदापूर, पिंपळगाव,
    गोपाळवाडी, कसबे-तडवळे,
    माणकेश्वर व बावी या गावा मध्ये फटाका बनवण्याचे कारखाने आहेत. येथील फटाका विशेषतः सुतळी बाम्ब महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे.
    यंत्रणेकडे आवाज मोजणीचे यंत्रच नाही !
    सुतळी बाॅम्बचा आवाज इतका मोठा असतो की त्या आवाजाने ५०० फुटापर्यंत असलेल्या व्यक्तींचे कान सुन्न होतात. काही क्षणासाठी माणुस बधीर होतो. हा आवाज मोजण्याचे यंत्र महसूल प्रशासन, वायु प्रदुषण महामंडळ व औद्योगिक महामंडळ (सुरक्षा) यांच्याकडे उपलब्ध नाही ही बाब अत्यंत निराशा जनक असून यास जबाबदार कोण तसेच जर या यंत्रणेकडे आवाज क्षमता मोजण्याचे यंत्र नसेल तर वरील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नेमके कशाचे व कोणते काम करतात ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे शासनाने ७५ डेसीबल आवाजाची मर्यादा ठरवून दिलेली आहे. मात्र तेरखेडा येथील फटाका १५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज देतात. आवाजाची मोजणी करण्याचे काम महसुल प्रशासनाचे नाही. यासाठी वेगळी यंत्रणा असल्याचा खुलासा संबंधित महसूल विभागाचे अधिकारी सांगत आहेत.
    प्रदुषण महामंडळाने जबाबदारी झटकली ?
    आवाज मोजणीचे यंत्र आमच्याकडे नाही. आम्ही फक्त हवेचे प्रदुषण पाहतो असे प्रदुषण विभागाचे अधिकारी सांगत आहेत. जर हवेचे प्रदुषण पहात असतील तर आवाजामुळे होणारे प्रदुषण कोण पाहणार ? असा प्रश्न उपस्थित झाला असून प्रदूषण महामंडळाने याची जबाबदारी कशामुळे झटकली ? हे मात्र अनुत्तरितच आहे.
    पोलीसांचे फक्त नाहरकत प्रमाणपत्र
    फटाका उत्पादन करणाऱ्या कारखानदारांना महसुल विभाग परवाना देतो. आमच्याकडे अर्ज आला तर आम्ही फक्त नाहरकत देतो. बाकीचे आम्ही पाहत नाही अस पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. जर फक्त ४२ कारखान्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले असेल तर उर्वरित कारखान्यांना चालविण्यासाठी परवानगी नसेल तर ते कशाच्या आधारे चालविले जातात ? याची जबाबदारी कोणाची हे मात्र समोर आले नाही.
    तेरखेडा परिसरात यापूर्वी अनेकदा दुर्घटना झालेल्या आहेत. संबधित कारखानदारांकडे आगीवर नियंत्रित करण्याची यंत्रना नसल्यामुळे इतर ठिकाणचे फायर ब्रिगेडची वाहने बोलावून आग विझवावी लागते. दुर्घटना घडल्यानंतर महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन फक्त पंचनामे करून जुजबी कारवाई करण्यापलीकडे इतर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली असल्याचे आजपर्यंतच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.
error: Content is protected !!