August 9, 2025

निवडणूक कालावधीत पत्रके व भित्तीपत्रकांच्या मुद्रणावर निर्बंध

  • धाराशिव (जिमाका) – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.निवडणूक कालावधीत निवडणूक पत्रके,भित्तीपत्रके इत्यादीचे मुद्रण व प्रकाशन या बाबींचे नियंत्रण लोकप्रतिनीधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२७ अ मधील तरतुदीव्दारे केले जाते.
    कोणतेही निवडणूक पत्रके, भित्तीपत्रके किंवा अशा इतर छापलेल्या साहित्यावर,छापणा-या व प्रसिद्ध करणा-या व्यक्तीची (मुद्रक व प्रकाशक) नावे व पत्ते सदर पत्रकाच्या प्रिंट लाईनमध्ये स्पष्टपणे नमुद करणे आवश्यक आहे. मुद्रांकित केलेल्या साहित्याच्या वस्तुच्या चार प्रती जिल्हादंडाधिकारी कार्यालयात छपाई केल्यानंतर ३ दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.जोडपत्र अ मध्ये कलम १२७ (अ) (२) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे असा मजकूर छापण्यात आल्यापासून ३ दिवसाच्या आत मुद्रकाने प्रकाशकाकडून मिळविलेले घोषणापत्र जिल्हादंडाधिकारी कार्यालयात सादर केले पाहिजे.
    या घोषणापत्रावर प्रकाशकाची स्वाक्षरी नावानिशी घेण्यांत यावी.तसेच भाग २ मध्ये दोन साक्षीदारांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.हे साक्षीदार प्रकाशकास व्यक्तीशः ओळखणारे असावेत.जोडपत्र (ब) मध्ये मुद्रकाने मुद्रीत केलेल्या साहित्याचा संपूर्ण तपशील प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रतीची संख्या,छपाईचा खर्च, छपाईचा दिनांक इत्यादी सर्व माहिती भरुन स्वतःच्या नावासह स्वाक्षरी करून सादर करावी. वरील सुचनाचे तसेच लोकप्रतिनीधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १२७ (अ) मधील तरतुदीचा भंग केल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल आणि संबंधिताविरुध्द अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. ज्यामध्ये मुद्रणालयाचा परवाना रद्द करण्याचा समावेश आहे.याची नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!