August 9, 2025

जलनाईक मधुकर धस यांच्या सोबतचा एक अनुभव

  • एका मानधनामध्ये मी आणि मधुकर धस यांनी काम करायचा निर्णय घेतला.रक्कम मिळणार होती,महिना सहाशे रुपये. म्हणजे दोघांसाठी तीनशे तीनशे रुपये मिळणार होते.सामाजिक कार्याची जबाबदारी स्वीकारून आम्ही वंचित विकास (जाणीव संघटना) जॉईन केली.
  • आमचे पहिले कार्यक्षेत्र म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील भोगजी. हे गाव कळंब तालुक्यातले. त्या परिसरात कार्याची सुरुवात 1989 साली एप्रिल मे महिन्यात केली.
    भोगजी गावातील सुग्रीव जाधवर या अल्पभूधारक शेतकऱ्यांने उदात्त भावनेने, मोठ्या मनाने, दानशुरांने एक एक्कर जमीन संस्थेला दान केली.तेथे विहीर खोदून शेतकऱ्यांसाठी विज्ञान-तंत्रज्ञान केंद्र बांधावं अशी संकल्पना घेऊन विहिरीच्या खोदकामाला सुरुवात केली.विहीर जुनी असल्यामुळे बरचसं काम कुदळ खोरं आणि टिकावाणी खोदली जात होतं.त्यावेळी आमचे प्रमुख, मार्गदर्शक आणि आजचे गुरु विश्वनाथ (आणा )तोडकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. वीहीर कामाची सुरुवात झाली.सोबत आमची दिनचर्याही सुरू होतीच. आता दिनचर्या म्हणजे नेमकं काय ?तर रोज एका गावात जावं.लहान मुलांसाठी अभिरुची घेऊन त्यांना कला शैक्षणिक कला कौशल आणि शिक्षणाकडे आकर्षित करूने,भाषण, नृत्य,गीत,अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाची वहिवाट करून देणे.युवकांसाठी मीटिंग,मेळावे,नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण.असा कार्यक्रम नियमित चालायचा.हळूहळू महिला बचत गटाची भाषा लोक बोलत होते. तेव्हा दरमहा पाच रुपये प्रमाणे विस महिलांनी बचत गट सुरूही केला होता.गावातले गाव प्रश्न लोकांच्या समोर ठेवायचे.सामाजिक बदलासाठी युवा पिढी निर्माण करायची.युवां संघटन निर्माण करायचे. तरुण मंडळ स्थापन करून गाव विकासात युवकांची भागीदारी वाढली पाहिजे म्हणून युवकांसाठी विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करायचो.सामाजिक बदलाचं,राष्ट्र निर्माणाचं स्वप्न घेऊन झपाटल्यासारखं कामाला लागलो.ज्या गावामध्ये युवक मंडळ स्ट्रॉंग झालं.त्या गावातले लाईट, पाणी, रोजगाराचे प्रश्न घेऊन आंदोलने करायचो.गाव विकासामध्ये कुठे भ्रष्टाचार झाल्यास तो उघडा करायचा.
    रचनात्मक विधायक आणि संघर्षात्मक अशा तिन्ही पटलावरती कार्य जोमात उभा रहात होतं.
    आज कळंब,वाशी,भूम, परंडा या तालुक्यामध्ये विधवांची माय म्हणून ओळखल्या जातात त्या सुनंदा खराटे, यांनी विहिरीच्या कामाची जबाबदारी न सांगताच उचलली.सगळ्या गड्यांना हाका मारणे,बायांना बरोबर घेणे, वेळेवर विहीर सुरू करणे, दिवसभर चेष्टा, मस्करी हसत खेळत लोकांना खुश ठेवून काम करून घ्यावं. माझी संघटना, आमची संघटना, आमचं कार्य असं तिच्या अंतर्मनात रुजलेलेच म्हणा की,तिच्यातली ती कला तिच्यातल्या निष्ठा पाहून नंतर त्या पर्याय संस्थेमध्ये कामाला लागल्या.विधवा परित्यक्ता त्यांच्या सामाजिक आर्थिक विकासाला मदत करण्यासाठी त्यांनी काम सुरू केलं.म्हणून त्या आज विधवांची माय म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत.
    दररोज मी आणि मधुकर यांनी विहिरीवर काम करायचं.टोपली भरून देणे,खोदकाम करणे, टप्प्यावर उभा राहणे,जिथे कमी तिथे आम्ही हा विचार घेऊन काम करायचो.सकाळ,संध्याकाळ गाव भेटी द्यायच्या.गावातले प्रश्न सोडवायचे. शासकीय योजना याची माहिती लोकांना द्यायची. त्याची मदत मिळवून द्यायची. मुलांसोबत, युवकांसोबत काम करायचं.आणि दिवसभर विहिरीवर काम करायचं.
    आता जुनी विहीर संपली होती.खाली खोदकाम जड जायला लागलं.मग बोरिंग मशीन कुठून आणायची. कशी मिळेल.याची चर्चा झाली.माहिती घेतली. कुणीतरी सांगितलं फकराबादच्या पुढे ते लोक राहतात.माहिती मिळविली.मग मधुकरणी पहाटे उठावं.पंचवीस तीस किलोमीटर अंतर सायकल वरती पार करावं.तिथे जाऊन ती मशीन घेऊन यावं.एक-दोन दिवस आड ती बोरिंग मशीन आणावी लागायची. त्यावेळी मोबाईल वगैरे काहीच नव्हता.प्रत्यक्षात भेटल्याशिवाय काम होणार नव्हतं.तो प्रसंग म्हणजे भोगजी,कोठावळा,पारा, फकराबाद त्यानंतर घाटनांदुर.अशी गावे पालथी घालून घाटनांदुरला जावं.त्याचं अंतर होतं बारा ते चौदा किलोमीटर.म्हणजे जाणं-येणं आठ्ठावीस ते तीस किलोमीटर.
    मी त्या अर्थाने त्या कार्यक्षेत्रात नवखा होतो.त्या विभागातल्या गावाची तेवढीशी मला माहित नव्हती.मग मधुकरनीच हा पुढाकार घ्यावा.पहाटे उठायचं.ते गाव गाठायचं. मशीनवाल्यांसोबत बोलायचं.आणि त्यांना घेऊन बोरिंग उडवण्यासाठी यायचं.हे काम तसं कठीण होतं.खूप वेळा मधुकर तिथं पोहचायचे आत ते बोरिंगवाले दुसऱ्या गावाला निघून गेलेले असायचे. ते लोक ज्या गावाला गेले असतील तिथे मधूनी जायचं.आणि त्यांचं काम झालं की ते मशीन घेऊन यायचं.तशा अर्थाने जीवघेणी ही कसरत तीन महिने चालू होती.मधुकर म्हणजे मधुर.मधुकर म्हणजेच गोड स्वभावाचा. मधुकर म्हणजे कष्टाळू. मधुकर म्हणजे निष्ठावान. नाही हा शब्द त्याच्या डायरीत कधीच नोंदला गेला नाही.

  • पहिला दिवस पहाटे उठला.सायकल काढली. डोक्याला टॉवेल बांधला. आणि टांग टाकून परस्पर निघून गेला.बोरिंग वाले लोक उठायच्या त्यांना घाटनांदुर गाठंलं.
    मशीन घेतली.सकाळी नऊ वाजता सेंटर गाटलं. विहिरीमध्ये बार उढविले. आणि लगबगीने आंघोळ करायला घरी आला.मी म्हटलं कुठे गेला होतास पहाटे.घाटनांदुर. किती लांब आहे?असेल 15-17 किलोमीटर.व्हय!!! बापरे मग मला का सांगितलं नाहीस? नाही नाही.नको. खूप लांब आहे ते.तू आळशी आहेस.तुला एवढा प्रवास जमला नसता.इतका दूरचा प्रवास पायंडल मारून ढुगणावरची पॅन्ट फाटली असती तुझी.आणि तिथं काय मटणाचं बरबाट होतं का तुला खायला.(मटणाचा आमटीला तिकडे बरबाट असे म्हणतात.)तेव्हा मी मधुकरची आई,आम्ही तिला(बाई) म्हणायचो.बहिन आशा, लहान भाऊ सुहास सर्वजण खादाखदा हसलो.
    मित्रांनो दिवसा आड तीस-पस्तीस किलोमीटर दूर जाऊन त्या बोरिंग वाल्याला आणायचं दिवसभर विहिरीवर काम करायचं.आणि संध्याकाळी एका गावामध्ये जाऊन गाव मीटिंग,सभा,मुलांचा अभिरुची वर्ग
    घेऊन रात्री दहा-अकरा वाजता घरी यायचं.नंतर पोटाला लागायचं. अशी दिनचर्या आमची किमान तीन महिने चालू होती.
    एका दिवशी पहाटे मधुकरणी मला उठविले. आणि म्हटला ये भुम्या ssss उठ उठ.मी उठलो.आता असं कर तू घाटनांदुरला जा.तो असं म्हटल्याबरोबर माझ्यावर येमराज आल्याचा प्रसंग ओढावला.कुठे जायचं. किती लांब जायचं.किती प्रवास असेल.किती गावं पालथी घालावी लागतील.अशा प्रश्नानीं भडीमार केला.मी मधुकरला म्हटलं,मधुकर मला गाव माहित नाही.तो म्हटला विचारत जायचं.लई लांब हाय की रं ssss
    मग मी कसा जातो? का हित्त बसून मशीन आणतो. तसंच तू पण जा आज.मला जावं तर लागणार होतं.मनाची अवस्था तर बिघडून गेली होती.कारण मधुकर पेक्षा मी खऱ्या अर्थाने आळशी होतो.सोबत त्याला रोज होणारा त्रास. त्यानच का सोसायचा.मीही मनाची तयारी करण्याचा प्रयत्न केला.
    तांबडं फुटायला लागलं होतं.हळू हळू गाव जागं व्हायला लागलं होतं. हागणदारीकडे जाणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांचे जड आवाज हळूहळू कानावर येत होते.तरी बऱ्यापैकी अंधार होताच.कोंबड्यांची बांग ऐकू येत होती.
    त्यावेळी मी मधुकरच्या शेजारी तुरीच्या काटक्या म्हणजे कुड उभारून केलेलं पत्र्याचं भाड्याचं घर. मी तिथं मधुकर च्या शेजारीच रहायचो.कधी माझ्या रूम मध्ये तर कधी त्यांच्या घरी रहायचं.तिथेच खायचं. त्यांच्या कुटुंबातला एक सदस्यच होऊन गेलो होतो. त्यांचं लेकरू म्हणून आम्ही आता प्रसिद्ध झालो होतो.कुणी सहज विचारलं की बाई म्हणायची मला चार लेकर हाईत. तेंव्हा मन भरून यावं.देवासारखी माणसे भेटल्याचं आनंद वाटायचा.माझ्या आई इतकीच माया करणारी बाई मला भेटून गेली.मित्र मधु,बहिण आशा, छोटा भाऊ सुहास आणि वडील नाना सर्वांनी मला भरभरून प्रेम दिलं.माया केली.त्यांनी मला माझे आई वडील आठऊ दिले नाहीत. सहा सहा महिने मी आई-वडिलांना भेटायला गेल्याचं आताही आठवत नाही.रविवारची सुट्टी नाही, ना सणाची सुट्टी नाही.सुट्टी नावाचा प्रकार आमच्या कागदात कधीच नव्हता.एवढा मी त्यांच्या कुटुंबात आणि सामाजिक समाज आम्ही दोघेही रमून गेलो.
    मधुकर चा आणि माझा पहाटेचा सुसंवाद बाईनं ऐकला.बाई उठून बसली.मधुला म्हणाली, मधु!!!! काय बाये ssss. आरं त्याला कुठ पाठीवतोसं !!!! गाव का, नाव का,शिव माहितीय.तूच जा गं माय ssss.असं म्हटल्याबरोबर मधुकर म्हणला.नाही बाये भूम्याचं काम नाही का ते ?त्याला जाऊ दे की.मी धा दिवस गेलोच की.भूम्या येकदाबी जात न्हाई.त्येचं काम नाही का ते.त्याला जाऊ दे.. उठ रं भूम्या उठ. घे सायकल. आणि जा पटकन. असा माझ्याकडे तोंड करीत हसरा चेहरा घेऊन बोलला.असं म्हटल्या बरोबर,माझं तोंड मी बारीक केलं.मग मधू बाईला बोलला.ये बाये बघ ना भूम्याचं तोंड कसं दिसतय.म्हशीच्या वागारा सारखं ( म्हशीचं रेडकू ) गेला घाबरून साला sssss.तवा मला थोडंसं हलकं वाटलं.बाई म्हणली नको रं लेकरू नाजूक हाय sssss.कुठे पाठवितो त्याला.जा बरं पटदिशी तूच sssss.मग मधुकर म्हटला अग बाई मला माहित नाही का भूम्या आळशी हाय आणि त्याला जमणार तरी का लंबी सायकल चालवायला.त्याला एवढा प्रवास सहन होणार नाही.मजा केली गं मी त्याची.तरीबी त्याला आता लय कामाला जूपणार हाय.त्याला कामाला जुपल्याशिवाय तो निपजणार नाही. समाजसेवा एवढी सोपी वाटते याला.
    मग बाई म्हणली लै गप्पा मारू नकू.समाजसेवक म्हनं. गप बस.कुटं जाईल.त्याला गाव तरी माहितेय का?त्यानं कसं ओळखावं.बास कर जा आता तू.त्याला परवास सहीन झाला नाही.काय दुखणं,भानं झालं तर आबई ( माझी आई) मला काय म्हनिल. लै बोलू नकू उशीर झालाय. जा पटकन. हो जातो. म्हणून मधूनं डोक्याला टॉवेल बांधला. सायकल बाहेर काढली.घरातून बाहेर जाता जाता.सालं sssss.आळशी. असं म्हणून सायकलवर टांग टाकून निघून गेला.
    मित्रांनो,सांगायचं म्हणजे कामावरील निष्ठा, कष्ट, जवाबदारी आणि सकारात्म ऊर्जा घेऊन जे लोक कार्य करतात ते इतिहास घडविता. अगदी मधुकर च्या बाबतीत असच झालं.
    एक वर्षानंतर मधुकरची बदली यवतमाळ जिल्ह्यात केली.तिथे त्यांनी तीन वर्ष वंचित विकास मध्येच नोकरी केली.1994 साली दिलासा नावाची संस्था स्थापन केली.हळूहळू ती नावारूपाला आली. जलसिंचनाचे एवढं मोठं काम त्यांनी उभा केलं,जनू पाण्याच्या स्त्रोताचं जाळच उभा केलं.जलसिंचनाचे वेगवेगळे मॉडेल उभे केले. पाणी आडविने, पाणी साठवणे. पाणी मातीत मुरविने.शेतीला पाणी पुरविणे.पिण्यासाठी पाणी पुरविने.अशी विविध प्रकारची मॉडेल्स गाव आणि शेतामध्ये उभी केली.
    मधुकर धस यांनी महाराष्ट्राला डोह मॉडेल दिलं.2012 ते 16 पर्यंतचा प्रचंड मोठा महाकाय पडलेला दुष्काळ त्यावरती मात करण्यासाठी महाराष्ट्रातल्या चौदा जिल्ह्यांमध्ये पाण्यावर काम केलं.हजारो सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते जोडले गेले.शेकडो संस्थाना पंचेवीस ते पांचेचाळीस हजार कोटी निधी उपलब्ध करून दिला.ही माहिती वाऱ्यासारखी महाराष्ट्रात, भारतामध्ये पसरत होती. दोराबजी टाटा ट्रस्ट, केअरिंग फ्रेंड्स, निमेश भाई रमेश भाई, फंसाळकर आमिर खान,नाना पाटेकर,मकरंद अनासपुरे, देवेंद्र फडणवीस,बाबा आमटे,विकास आमटे ही दिग्गज मंडळी मधुकरच्या प्रेमात पडली होती.एवढं मोठं काम करणारे मधुकर धस यांना 2015-16 साली पाणीदार माणूस म्हणून, जलमित्र,जलनायक म्हणून आयबीएन लोकमत यांनी देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये. पाणीदार माणूस म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केलं.त्या जलनायकाला,पाणीदार माणसाला,त्या महावीराला आमचा लाख लाख सलाम.
    “मरावे परी कीर्तीरूपी उरावे” असा कीर्तीवंत, गुणवंत समाजसेवक मधुकर धस यांनी तीन डिसेंबर 2016 साली यहलोकीचा निरोप घेतला. असा एक मधुकर आणि दुसरा भूमिपुत्र वाघ घडवणाऱ्या त्या गुरु विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांनाही मानाचा मुजरा…

  • लेखक – भूमिपुत्र वाघ
error: Content is protected !!